नवीन वर्षाच्या उत्साहाला छेडछाडीचे गालबोट

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

बंगळूरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी यंदा वेळ वाढवून देण्यात आली होती. व्यापाऱ्यांकडून विशेषतः मद्यविक्रीच्या दुकानचालकांच्या दबावामुळे मध्यरात्री दोनपर्यंत वेळ दिली होती. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंगळूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता तरी मोटार, दुचाकी व रस्त्यावरून मौजमस्ती करीत फिरणाऱ्या जमावाकडे पाहत बसण्यापलीकडे पोलिस काही करू शकले नाहीत

 

बंगळूर - नवीन वर्षाचे स्वागत बंगळूरमध्ये जल्लोषात झाले. मात्र नवीन वर्षाची पहाट महिलांसाठी मात्र त्रासदायक ठरली. 31 डिसेंबरला शहरातील सर्वात गजबजलेल्या एम. जी. व ब्रिगेड रस्त्यावर सामूहिक छेडछाडीच्या घटना घडल्या. अगदी पोलिसांचा फौजफाटा असतानाही रोडरोमिओंनी उच्छाद मांडला होता.

नवीन वर्ष साजरे करण्यासाठी या रस्त्यांवर शनिवारी रात्री प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी 1500 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तरीही हजारो रोडरोमिओ सामूहिकपणे महिलांची छेड काढीत, टोमणे मारीत फिरत होते. बंगळूरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी यंदा वेळ वाढवून देण्यात आली होती. व्यापाऱ्यांकडून विशेषतः मद्यविक्रीच्या दुकानचालकांच्या दबावामुळे मध्यरात्री दोनपर्यंत वेळ दिली होती. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंगळूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता तरी मोटार, दुचाकी व रस्त्यावरून मौजमस्ती करीत फिरणाऱ्या जमावाकडे पाहत बसण्यापलीकडे पोलिस काही करू शकले नाहीत.

रोडरोमिओंच्या त्रासाविरोधात काही महिलांनी पोलिसांकडे मदत मागितली, तर काहींना स्वरक्षणासाठी स्वतःची चप्पल काढावी लागली. महिलांना त्रास देण्याच्या घटना अनेकांनी पाहिल्या असल्या, काहींनी त्याचे चित्रीकरणही केले असले, तरी पोलिसांनी मात्र विनयभंग व छेडछाडीची एकही तक्रार आली नसल्याचे सांगितले.

Web Title: women molested