#GargiCollege : गॅदरिंगवेळी राडा; मुलींची छेडछाड काढल्याने संसदेत उमटले पडसाद!

वृत्तसंस्था
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

मद्यपान केलेले काही पुरुष महाविद्यालयाच्या गेटवर उभे राहिले. त्यांनी मुलींना आत जाण्यापासून रोखले आणि त्यांची टिंगलटवाळी केली.

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात झालेल्या विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या निषेधार्थ शेकडो विद्यार्थिनींनी सोमवारी (ता.10) आंदोलन केले. 
या घटनेची चौकशी सुरू असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या महाविद्यालयात ६ फेब्रुवारीला वार्षिक स्‍नेहसंमेलन होते, त्या वेळी मद्यपान केलेले काही पुरुष महाविद्यालयाच्या गेटवर उभे राहिले. त्यांनी मुलींना आत जाण्यापासून रोखले आणि त्यांची टिंगलटवाळी केली अशी तक्रार काही विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे दिली आहे.

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाविद्यालयाच्या प्रशासनाने त्यात गंभीरपणे लक्ष घातले. शेकडो विद्यार्थिनींनी आज महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले. ही घटना ज्या वेळी घडली तेव्हा शीघ्र कृती दल आणि दिल्ली पोलिसांचे पथक जवळच उभे होते; पण तरीही तेथे सुरक्षितता बाळगण्यात आली नाही.

साधारण तिशीतील पुरुषांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेडछाड केली आणि अत्याचारही केले, असा दावा विद्यार्थिनींच्या गटाने केला आहे. महाविद्यालयात सुरक्षा व्यवस्था होती, असा दावा प्रशासन करीत असले, तरी देशातील कोणत्याही महाविद्यालयात असा प्रकार घडला असेल, असे वाटत नाही, अशी माहिती एका विद्यार्थिनीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. 

या घटनेची माहिती घेण्यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी आज महाविद्यालयाला भेट दिली. याप्रकरणी दोषींवर योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन पोलिस उपआयुक्त (दक्षिण) अतुल कुमार ठाकूर यांनी दिले. 

संसदेतही चर्चा 

दरम्यान, या घटनेवरून राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घटना अत्यंत निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. दोषींना शिक्षा मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसचे सदस्य गौरव गोगोई यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला, त्यावर याप्रकरणी कारवाई करण्याचा आदेश महाविद्यालय प्रशासनाला दिल्याचे मनुषयबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens Panel Team Visits Gargi College after Gargi College molestation case