esakal | अचूक हवामान अंदाजामुळे देशात जीवितहानीत घट; संशोधकांचा निष्कर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

RAIN

देशात हवामान विभागाने गेल्या पन्नास वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे अचूक हवामानाचे अंदाज देण्यावर भर दिला आहे. देशभरात तीव्र हवामानाच्या घटनांमुळे होणाऱ्या जीवितहानीत जवळपास ४८ टक्क्यांनी घट झाली. 

अचूक हवामान अंदाजामुळे देशात जीवितहानीत घट; संशोधकांचा निष्कर्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशात हवामान विभागाने गेल्या पन्नास वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे अचूक हवामानाचे अंदाज देण्यावर भर दिला आहे. देशभरात तीव्र हवामानाच्या घटनांमुळे होणाऱ्या जीवितहानीत जवळपास ४८ टक्क्यांनी घट झाली. हवामान अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापनातील सुधारणांमुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचले आहेत, असा निष्कर्ष संशोधनातून निघाला आहे. भारतात गेल्या पाच दशकांत हवामानाच्या तीव्र घटनांमुळे झालेल्या जीवितहानीच्या संशोधनाचा आढावा ‘वेदर अॅंड क्लायमेट एक्स्ट्रीम्स’ या नियतकालिकाने घेतला. यामध्ये ‘महालनोबिस नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर’चे एस. एस. रे, भूविज्ञान मंत्रालयाचे कमलजित रे, एम. राजीवन, भारतीय हवामान हवामानशास्त्र विभागाचे आर. के. गिरी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे ए. पी. डिमरी या शास्त्रज्ञांचा या संशोधनात सहभाग आहे.

देशात १९७० ते २०१९ या कालावधीत सात हजार ६३ हवामानाच्या तीव्र घटना नोंदविल्या गेल्या. यामध्ये अतिवृष्टी आणि पूर, चक्रीवादळे, उष्णतेची लाट, थंडीची लाट, विजा पडणे अशा घटनांचा समावेश होता. या घटनांमुळे पाच दशकांत देशभरात एकूण एक लाख ४१ हजार ३०८ व्यक्तींचा मृत्यू झाला. मात्र, १९७० ते १९९९ आणि २००० ते २०१९ या दोन दशकातील तुलना केल्यास पहिल्या दोन दशकांच्या तुलनेत नंतरच्या दोन दशकांत तीव्र हवामानाच्या घटनांत वाढ होऊनही जीवितहानी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

हे वाचा - जगावर कोरोनापेक्षा पाण्याचं संकट मोठं; 2025पर्यंत येईल भयंकर परिस्थिती

संशोधनातील निष्कर्ष
- आधीच्या दोन दशकांच्या तुलनेत गेल्या दोन दशकांत तीव्र हवामानाच्या घटनांमुळे होणारी जीवितहानी ४८. ६ टक्क्यांनी कमी झाली आहे.
- चक्रीवादळ आणि पूर यामुळे होणाऱ्या जीवितहानीत तब्बल ७५ टक्क्यांनी घट
- अचूक हवामान अंदाज आणि त्याला अनुसरून स्थानिक पातळीवर वेळेत केलेल्या आपत्ती नियोजनाचा परिणाम
- राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर गेल्या दोन दशकांत उष्णतेची लाट आणि विजा पडून होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ

उष्णतेची लाट आणि विजा पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित राज्यांनी परिस्थितीनुसार आपत्ती नियोजन करण्यावर अधिक भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.
- आर. के. गिरी, हवामानशास्त्र

गेल्या १९७० ते २०१९ या काळातील जीवितहानीचे प्रमाण :
उष्णतेची लाट येण्याच्या  ७०६ घटना घडल्या असून १७ हजार ३६२ मृत्यू झाले आहेत. तर या कालावधीत 546 वेळा थंडीची लाट आली असून यामध्ये 9 हजार 596 मत्यू झाले आहेत. चाळीस वर्षांमध्ये 3 हजार 175 पूर आले असून यात जवळपास 65 हजार 130 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय 2 हजार 517 वेळा वीज पडून झालेल्या दुर्घटनेत 8 हजार 862 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दशकात 117 चक्रीवादळांचा तडाखा बसला असून यात तब्बल 40 हजार 358 जणांचा मृत्यू झाला आहे. 

हे वाचा - २३ मार्च रोजीच का साजरा केला जातो शहीद दिवस?

घटनेनुसार सर्वाधिक प्रभावित झालेली पहिली पाच राज्ये :
थंडीची लाट - बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान
उष्णतेची लाट - आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा
पूर - उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, उत्तरांखड, आंध्र प्रदेश, बिहार
विजा पडणे - महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश
चक्रीवादळ - ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, तमिळनाडू