ईमान अहमदचे वजन 120 किलोने झाले कमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

जगातील सर्वाधिक वजन असलेल्या महिलेने अवघ्या एका महिन्यात कोणत्याही शस्त्रक्रियेविना तब्बल 120 किलो वजन कमी केल्याचे समोर आले आहे. तिच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नवी दिल्ली - जगातील सर्वाधिक वजन असलेल्या महिलेने अवघ्या एका महिन्यात कोणत्याही शस्त्रक्रियेविना तब्बल 120 किलो वजन कमी केल्याचे समोर आले आहे. तिच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

इजिप्तमधील ईमान अहमद या महिलेचे 500 किलो वजन होते. तिला उपचारांसाठी 11 फेब्रुवारीरोजी विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. दरम्यान, मुंबईत आल्यानंतर अवघ्या एक महिन्यातच कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय तिचे वजन 120 किलोने कमी झाले आहे. सध्या तिचे वजन 380 किलो आहे. 'तिचे वजन 50 किलोने कमी होईल, अशी आम्हाला आशा होती. मात्र 100 किलो वजन कमी झाल्याचे आम्हाला आढळून आले आहे', अशी माहिती ईमानवर उपचार करणारे डॉ. मुफज्जल लकडावाला यांनी दिली. तिचे वजन कमी झाल्यामुळे तिचे शरीर आता एमआरआय मशिनमध्ये जाऊ शकेल. आणखी वजन कमी करण्यासाठी तिच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहितीही लकडावाला यांनी दिली. वजन कमी करण्यासाठी तिला मागील एक महिन्यापासून लिक्विड डाएटवर ठेवण्यात आले. शरीरातील अतिरिक्त पाणी निघून गेल्याने तिचे वजन कमी झाले.

कोण आहे इमान अहमद?
इमानचा जन्म 1980 साली झाला. जन्मावेळी तिचे वजन तब्बल पाच किलो होते. तिला थायरॉइडचा त्रास होता. त्यामुळे तिला शालेय शिक्षणही थांबवावे लागले. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आवश्‍यक ते उपचार घेण्यासाठी तिला विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. पहिल्या मजल्यावरील तिच्या घराची भिंत फोडून 40 फूट अंतरावरील ट्रकमध्ये टाकून तिला विमानतळापर्यंत पोचविण्यात आले. तिच्यावर उपचारासाठी दानशूरांनी केलेल्या मदतीमुळे रुग्णालयाकडे आतापर्यंत 60 लाख रुपये जमा झाले आहेत.

Web Title: World's heaviest woman Eman Ahmed loses over 120 kg