IISF19 : कलकत्यात होणार जगातील सर्वात मोठा विज्ञान महोत्सव  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

चार विश्‍व विक्रम होणार प्रस्थापित 
विज्ञानाच्या या कुंभमेळ्यात चार विश्‍वविक्रम प्रस्थापित केले जाणार आहे. यामध्ये मंगळवारी (ता.5) एकाच वेळेस 1 हजार 750 विद्यार्थ्यांना खगोल भौतिकशास्त्राचा तास घेण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना हजारो प्रकाशवर्षे दुर असलेल्या ताऱ्यावरील रासायनिक आणि भौतिक बदलांची माहिती देण्यात येणार आहे. हा या विषयावरील जगातला सर्वांत मोठा वर्ग ठरणार आहे. 

पुणे : भारतीय विज्ञानाचा उत्सव समजल्या जाणाऱ्या 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टीवल'चे आयोजन कोलकता येथे होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा महोत्सवाचे मंगळवार (ता.5) ते शुक्रवार (ता.8) दरम्यान विश्‍व बांगला कन्व्हेंशन सेंटरमध्ये पार पडणार आहे. 55 देशांचा सहभाग असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते होणार आहे. 

उद्घाटन समारंभाला भुतानचे शिक्षणमंत्री जयबीर राय, मालदिवचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जलेह जमाल, म्यानमारचे शिक्षणमंत्री डॉ. स्वीन माऊंग आये, कोरियाचे राजदूत चोय जॉंग हो, इंग्लंडचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा.लॉफ हेड उपस्थित असणार आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच विज्ञान भारतीच्या वतीने हे आयोजन होत आहे.
देशभरातील 1 हजार 750 विद्यार्थ्यांना महोत्सवात आमंत्रित करण्यात आले असून विविध संशोधन संस्थांचे संचालक आणि वरिष्ठ वैज्ञानिक यात सहभागी होणार आहे. पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राचे संचालक डॉ. सोमंक रॉय चौधरी, प्रा.संघमित्रा बंडोपाध्याय, प्रा.कुनाल रे, डॉ. अवनीकुमार सिंग आदी वरिष्ठ वैज्ञानिक उपस्थित असणार आहे. 

महोत्सवात सहा समांतर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी, युवा संशोधक, आंतरराष्ट्रीय विज्ञान संस्था यांसाठी वेगवेगळ्या चर्चासत्रांचे, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. 2015 साली भारतीय विज्ञान क्षेत्रात जनसहभाग वाढविणे आणि त्याला अधिक दर्जात्मक करण्यासाठी या महोत्सवाची सुरवात झाली महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे. 

चार विश्‍व विक्रम होणार प्रस्थापित 
विज्ञानाच्या या कुंभमेळ्यात चार विश्‍वविक्रम प्रस्थापित केले जाणार आहे. यामध्ये मंगळवारी (ता.5) एकाच वेळेस 1 हजार 750 विद्यार्थ्यांना खगोल भौतिकशास्त्राचा तास घेण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना हजारो प्रकाशवर्षे दुर असलेल्या ताऱ्यावरील रासायनिक आणि भौतिक बदलांची माहिती देण्यात येणार आहे. हा या विषयावरील जगातला सर्वांत मोठा वर्ग ठरणार आहे. 

बुधवारी (ता.6) अवरक्त (इन्फ्रारेड) लहरींच्या वापरातून फोनवरील संभाषण होणार आहे. यामध्ये 950 विद्यार्थी सहभाग नोंदविणार आहे. गुरुवारी (ता.7) चारशे विद्यार्थी रेडिओ लहरिंच्या माध्यमातून विविध प्रयोग करणार आहे. तर शुक्रवारी (ता.8) सुमारे चारशे विद्यार्थी मानवी साखळीच्या माध्यमातून गुणसुत्रांची प्रतिकृती तयार करणार आहे. जर हे सर्व प्रयोग यशस्वी झाले तर त्यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world's largest science festival to be held in Calcutta