पुलवामा हल्ल्याचा जगभरातून निषेध

वृत्तसंस्था
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने गुरुवारी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा जगातील सुमारे 48 देशांनी निषेध केला आहे. 

नवी दिल्ली : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने गुरुवारी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा जगातील सुमारे 48 देशांनी निषेध केला आहे. 

व्हाइट हाउसने दिलेल्या निवेदनात हल्ल्याचा निषेध व्यक्त करत हुतात्मा पडलेल्या जवानांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. पुलवामाचा हल्ला निंदनीय आणि भ्याड असल्याचे नमूद केले. त्याच वेळी पाकिस्तानने आपल्या भूमीचा वापर दहशतवाद्यासाठी करू देऊ नये, असेही व्हाइट हाउसने नमूद केले आहे. या हल्ल्यामागचा सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी अमेरिका भारताला सर्वोतोपरी सहकार्य करेल, असेही म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ल्यात जखमी झालेले जवान लवकर बरे होवोत, अशी कामना व्यक्त करण्यात आली आहे. रशियन दूतावासानेही हल्ल्याची निंदा केली आहे. याशिवाय फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरिया, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, इराण, इस्रायल आदींसह सुमारे 48 देशांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्‌विट करत म्हटले, की आमचे परममित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आम्ही आपल्या आणि भारताचे सुरक्षा दल आणि जनतेसमवेत आहोत. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worldwide Protest of Pulwama attack