शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी द ग्रेट खली मैदानात; म्हणाला सरकारची गाठ आमच्याशी आहे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

तो म्हणाला, केंद्र सरकारची गाठ पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांशी पडली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी एकवटले आहेत. मोठ्या निश्चयासह ते केंद्र सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांचा हा निश्चय आता अधिक दृढ करण्यासाठी भारताचा WWE चा सुपरस्टार खेळाडू द ग्रेट खलीही रस्त्यावर उतरला आहे. या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ त्याने घोषणाही दिल्या आहेत. सध्या त्याच्या या पाठिंब्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. शेतकऱ्यांचं समर्थन करुन खलीने म्हटलंय की, या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करुन कृषी कायदे मागे घ्या. सहा महिन्यांचं रेशन सोबत घेऊनच आम्ही आलो असून जोपर्यंत सरकारकडून या मागण्या मान्य होत नाहीत तोवर मागे हटणार नाही, असंही खली म्हणाला.

शेतकरी बांधवांकडून धान्य स्वस्तात विकत घेतलं जाईल आणि ते सामान्य माणसाला मात्र 200 रुपयांच्या आसपासच्या हिशेबानं विकलं जाईल. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर वर्गाचं नुकसान होणार आहे, असंही खली म्हणाला. सर्व लोकांना त्यानं विनंतीही केलीय की शेतकऱ्यांसोबत रहा जेणेकरुन सरकारवर हे कायदे मागे घेण्यासाठी दबाव राहिल. 

हेही वाचा - MDH चे आजोबा कालवश; वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

केंद्र सरकारची गाठ पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांशी पडली आहे. त्यांचा सामना करणं तितकं सोपं नाही. आम्ही येताना सहा महिन्यांचं रेशन घेऊन आलोय. या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आम्ही मागे हटणार नाही, असं तो म्हणाला. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. सरकारने विशेष सत्र बोलावून तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, अन्यथा आम्ही दिल्ली ब्लॉक करु, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सरकारने पंजाबसोबतच देशभरातील शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलवावे, असंही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wwe wrestler the great khali joined protest of farmers against farm laws