हैदराबाद बॉंबस्फोट- यासिन भटकळसह चौघे दोषी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : हैदराबादमधील दिलसुखनगर येथील दुहेरी बॉंबस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने आज मोहंमद अहमद सिद्दिबप्पा ऊर्फ यासिन भटकळ आणि इतर चार जणांना दोषी ठरविले. दहशतवादी कारवाया केल्या प्रकरणी बंदी घालण्यात आलेल्या "इंडियन मुजाहिदीन'च्या सदस्यांना न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. या बॉंबस्फोटांमध्ये 18 जण ठार झाले होते, तर 131 जण जखमी झाले होते.

"एनआयए'च्या विशेष न्यायालयाने 2013मध्ये हैदराबाद येथील दुहेरी बॉंबस्फोट प्रकरणी भटकळ याच्यासह असदुल्ला अख्तर (उत्तर प्रदेश), झिया उर रेहमान ऊर्फ वक्कास (पाकिस्तान) तहसीन अख्तर (बिहार) आणि अझिझ शेख (महाराष्ट्र) यांना दोषी ठरविले. हे सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना 19 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या बॉंबस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधार रियाझ भटकळ याने कराचीतून सर्व सूत्रे हलवली असल्याचे सांगण्यात येते. तपास संस्था अद्याप त्याच्यापर्यंत पोचू शकलेल्या नाहीत.

या प्रकरणातील शेवटचा युक्तिवाद मागील महिन्यात पूर्ण झाला होता. त्यात 157 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीला मागील वर्षी 24 ऑगस्ट रोजी सुरवात झाली होती. ""तपास पथकाने प्रत्येक पुराव्याची सखोल चौकशी केली. "इंडियन मुजाहिदीन'च्या दहशतवाद्यांना प्रथमच न्यायालयान दोषी ठरविले आहे. त्यांना अधिकाधिक शिक्षा सुनावण्याची मागणी आम्ही करणार आहोत,'' असे "एनआयए'चे महासंचालक शरद कुमार यांनी सांगितले. या प्रकरणाचा कट "इंडियन मुजाहिदीन'ने आखला होता, असा आरोप "एनआयए'च्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

Web Title: yasin bhatkal convicted