esakal | 4 वर्षात काँग्रेसच्या 170 आमदारांचे पक्षांतर; भाजपमध्ये जोरदार 'इनकमिंग'
sakal

बोलून बातमी शोधा

bjp congress

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भाजपला बळकटी मिळाली आहे तर दुसऱ्या बाजुला सर्वात जुना पक्ष असललेल्या काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. यात गेल्या चार वर्षात काँग्रेसला मोठे धक्के बसले आहेत.

4 वर्षात काँग्रेसच्या 170 आमदारांचे पक्षांतर; भाजपमध्ये जोरदार 'इनकमिंग'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भाजपला बळकटी मिळाली आहे तर दुसऱ्या बाजुला सर्वात जुना पक्ष असललेल्या काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. यात गेल्या चार वर्षात काँग्रेसला मोठे धक्के बसले आहेत. 2014 च्या तुलनेत भाजपनं 2019 च्या लोकसभेत एकहाती सत्ता काबीज केली. 2016 पासून काँग्रेसचे तब्बल 170 आमदार पक्ष सोडून गेले आहेत. याबाबतची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मने एका रिपोर्टमध्ये दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, 2016-2020 दरम्यान झालेल्या निवडणुकांवेळी काँग्रेसचे 170 आमदार इतर पक्षांमध्ये गेले. तर याच कालावधीत जवळपास 7 राज्यसभा खासदारांनी काँग्रेसला रामराम केला. 

एडीआरच्या रिपोर्टनुसार, सर्वाधिक इनकमिंग हे भाजपमध्ये झालं. 2016 ते 2020 या कालावधीत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्या 405 आमदारांपैकी 182 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर 28 जण काँग्रेस आणि 25 जण तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये गेले. याशिवाय 2019 च्या लोकसभेवेळीही अनेक नेत्यांनी पक्ष बदलला. यात पाच लोकसभा खासदारांनी भाजप सोडून इतर पक्षांची वाट धरली. तर काँग्रेसचे सात राज्यसभा खासदार इतर पक्षांमध्ये गेले. 

हे वाचा - "कृषी कायदे मागे घेतले तर मोदी अधिक ताकदवान नेते म्हणून पुढे येतील"

काँग्रेसची पडझड
काँग्रेसची साथ सोडणाऱ्यांची संख्या मोठी असताना भाजप सोडलेल्यांची संख्या कमी आहे. एडीआरच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार 2016 ते 2020 या कालावधीत काँग्रेसचे 170 आमदार सोडून गेले तर भाजपचे फक्त 18 आमदार इतर पक्षांमध्ये गेले. 

भाजप प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक
पक्ष बदलणाऱ्या आमदारांमध्ये सर्वाधिक नेते हे काँग्रेसचे होते. हे प्रमाण जवळपास 42 टक्के इतकं होतं तर इतर पक्षांमध्ये जाणाऱ्या आमदारांमध्ये भाजपचे फक्त 4.4 टक्के आमदार होते. याऊलट इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांची संख्या 44.9 टक्के इतकी होती तर 9.4 टक्के आमदार असे होते जे इतर पक्षातून काँग्रेसमध्ये आले होते.

हे वाचा - दिलेला शब्द पाळणारा नेता; राहुल गांधींचा व्हिडिओ चर्चेत!

राज्यात सत्तापालट
एडीआरने म्हटलं की, विशेष म्हणजे मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटकात सरकार स्थापनेमध्ये या पक्ष बदलणाऱ्या आमदारांची मोठी भूमिका राहिली. यामुळे काही राज्यात सत्तापालटही झाला. रिपोर्टनुसार पक्ष बदलल्यानंतर राज्यसभा निवडणूक पुन्हा लढणाऱ्या 16 राज्यसभा खासदारांपैकी 10 जण भाजपमध्ये गेलेले आहेत. 

एडीआरने आणखी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, तामिळनाडुत सध्या 204 आमदार असून त्यापैकी 33 टक्के आमदारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. गुन्हे असलेल्या आमदारांची संख्या जवळपास 68 इतकी आहे. सध्याच्या एकूण आमदारांपैकी 38 जणांविरोधात गंभीर गुन्हे आहेत. यामध्ये अजामीनपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. ज्यात पाच वर्षांपेक्षा जास्त कैदेच्या शिक्षेची तरतूद असते. 

loading image