येडि-डीकेंच्या भेटीने कर्नाटकात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

बंगळूर - भाजप प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा व काँग्रेसचे प्रभावी नेते, पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी (ता. २८) सुमारे २० मिनिटे गुप्त चर्चा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळण्याच्या शक्‍यतेने राज्यात खळबळ उडाली. भाजपने शिवकुमार यांना भावी मुख्यमंत्री संबोधून आधीच राजकीय क्षेत्रात औत्सुक्‍य निर्माण केले आहे.

बंगळूर - भाजप प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा व काँग्रेसचे प्रभावी नेते, पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी (ता. २८) सुमारे २० मिनिटे गुप्त चर्चा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळण्याच्या शक्‍यतेने राज्यात खळबळ उडाली. भाजपने शिवकुमार यांना भावी मुख्यमंत्री संबोधून आधीच राजकीय क्षेत्रात औत्सुक्‍य निर्माण केले आहे.

भाजपचे राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, आमदार हरताळ हालप्पा, शिमोग्याचे खासदार बी. वाय. राघवेंद्र, वनमंत्री आर. शंकर यांनी आज डी. के. शिवकुमार यांच्या कार्यालयात बैठक घेतली. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ८ पाणीपुरवठा योजनांचा प्रस्ताव शिवकुमार यांच्यासमोर ठेवला व त्यांना गती देण्याची विनंती केली. त्यानंतर येडियुरप्पा व शिवकुमार यांनी अँटी चेंबरमध्ये सुमारे २० मिनिटे गुप्त चर्चा केली.

बैठकीनंतर दोन्ही नेते संयुक्तपणे पत्रकारांना सामोरे गेले. दोघांनीही पत्रकारांशी बोलताना, विकास कामांवर चर्चा झाली, राजकीय विषयावर नाही, असे सांगितले. मात्र तेथून निघून जाताना, येडियुरप्पा यांनी राजकीय चर्चा प्रसारमाध्यमांसमोर उघड करता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्‍य निर्माण झाले.

भाजपचे नेते शिवकुमार यांचे राजकीय सामर्थ्य ओळखून आहेत. भाजप श्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच तुमची भेट घेत आहोत. योग्यवेळी योग्य निर्णय घ्या, तुमच्या निर्णयावरच तुमचे आणि आमचेही राजकीय भवितव्य अवलंबून आहे, असे भाजप नेत्यांनी सांगून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

धजदला धडा शिकविण्यासाठी..
येडियुरप्पा यांनी प्रदीर्घ काळानंतर शिवकुमार यांची भेट घेऊन धजदला अद्दल घडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा वेगवेगळा अर्थ काढण्यात येईल, याची जाणीव असतानाही दोन्ही नेते विकासाचे निमित्त करून एकत्र आले होते. मात्र त्यांच्या भेटीमुळे चर्चांना वेग आला आहे.

डॉ. कोरेंच्या वक्तव्याची पार्श्‍वभूमी
गुप्त चर्चेत येडियुरप्पा यांनी काही राजकीय पर्याय त्यांच्यासमोर ठेवल्याचे समजते. भाजप नेते डॉ. प्रभाकर कोरे यांनी अलीकडेच केएलईच्या कार्यक्रमात बोलताना, डी. के. शिवकुमार लवकरच मुख्यमंत्री होतील, तो काळ आता जवळ आला आहे, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्या आधारेच शिवकुमार यांच्याशी आज चर्चा करण्यात आल्याचे समजते.

Web Title: yeddyurappa Shivkumar meeting