योगींनी मोदींची तुलना केली शिवाजी महाराजांशी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. काही आठवडयांपूर्वी समाजवादी पार्टीच्या प्रमुखांची मुगल शासक औरंगजेब बरोबर तुलना केली होती.

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. काही आठवडयांपूर्वी समाजवादी पार्टीच्या प्रमुखांची मुगल शासक औरंगजेब बरोबर तुलना केली होती.

लखनऊमध्ये कुर्मी आणि पटेल समाजाच्या मेळाव्याला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, 'औरंगजेबने उन्माद माजवला होता, त्यावेळी त्याला भारत मातेचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी नतमस्तक होण्यास भाग पाडले होते. औरंगजेबचा सेनापती अफजल हा अनेकवेळा शिवाजी महाराजांना भेटू इच्छित होता. मात्र त्याचा हेतू शिवाजी महाराजांनी ओळखला होता. तो शिवाजी महाराजांची हत्या करणार होता. मात्र महाराजांनी त्याचा हा डाव उलटवला होता. शिवाजी महाराजांप्रमाणेच मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. चीन सुद्धा अनेकवेळा घुसखोरी करत आहे, पण मोदी सरकारमुळे त्यांना मागे हटावेच लागत आहे.'

'पंतप्रधान नरेद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे जिथे ज्या प्रकारची गरज आहे तिथे त्या प्रकारची रणनिती अवलंबली. काँग्रेसने पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रभक्तीचे धडे घेतले पाहिजेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरीबी हटावचा नारा दिला पण मोदी सरकारच्या योजनांमुळे आज फरक दिसतो. काँग्रेसने सरदार पटेलांचा अपमान केला, तर भाजपने त्यांचा सन्मान केला. पुढच्यावर्षी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय हा देशद्रोही आणि भारत विरोधी तत्वांना उत्तर असेल,' असेही योगी म्हणाले.

'देशाचा संक्रमण काळ सुरु आहे. मोदींच्या नेतृत्त्वात देश आर्थिक महाशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र त्याचवेळी समाजकंटकांकडून देशात जाती, भाषा, प्रांताच्या आधारे नक्षलवाद आणि माओवादाला चालना देण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशात राजकीय अस्थिरता निर्माण करणाऱ्यांना आपण 2019 ला पुन्हा उत्तर देऊ. आज जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची मान उंचावली आहे,' असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

योगींचे भाषण सुरू असताना वीज गायब...
योगी आदित्यनाथ यांचे भाषण सुरू असताना अचानक वीज गायब झाली. यामुळे त्यांना काही वेळ भाषण थांबवावे लागले. वीज सुरू झाल्यानंतर त्यांनी भाषण सुरू केले.

Web Title: yogi adityanath compares narendra modi with shivaji maharaj