योगींची वाटचाल पंतप्रधानपदाकडे?, पक्ष देणार मोठी जबाबदारी

योगी आदित्यनाथ यांची भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळात वर्णी लागणार
Narendra modi, Yogi Adityanath
Narendra modi, Yogi AdityanathSakal

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात सलग विजयासह दुसऱयांदा सत्ता मिळविणारे मुख्यमंत्री ठरणारे योगी आदित्यनाथ यांचे राष्ट्रीय राजकारणात आणखी एक पाऊल पुढे पडण्याचे मजबूत संकेत मिळाले आहेत. आज दिल्लीचा दौरा करणारे योगी आदित्यनाथ यांची वर्णी भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळात लागणार हे जवळपास निश्चित आहे. सत्तारूढ पक्षाच्या या सर्वशक्तीमान मंडळात स्थान मिळणे हे योगी यांच्या भावी पंतप्रधानपदाची दावेदारी मजबूत करणारे ठरणार आहे. ‘सुयोग्य वेळ'आल्यावर योगी यांना भाजपच्या मातृसंस्थेकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

योगी यांचा भाजप संसदीय मंडळातील संभाव्य प्रवेश हा त्यांची वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच मार्गावरून सुरू असल्याचेही द्योतक मानले जाते. याआदी २०१३ मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना भाजपने आधी त्यांचा संसदीय मंडळात समावेश करून नंतर त्यांना पंतप्रदानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही या मंडळात सामील करून घेण्यात आले होते. योगी यांचा समावेश झाल्यास ते या मंडळातील दुसरे मुख्यमंत्री ठरतील. आपल्या दिल्ली दौऱयात योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान मोदी, संररक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व भाजपाध्यक्ष जे पी नड्डा या वरिष्ठ नेत्यांशी गाठीभेटी करतील. मोदी यांना भेटल्यावर भाजपकडून त्यांच्या संसदीय मंडळातील समावेशाबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते. राजनाथसिह, शहा व गडकरी या तिघांनीही याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले आहे. भाजप संसदीय मंडळात सुषमा स्वराज, अरूण जेटली व अनंतकुमार या दिग्गजांच्या निधनानंतर तीन जागा रिक्त आहेत.

२०२४ मध्ये सलग दहा वर्षे पंतप्रधानपदी राहणारे व भाजपच्या ७५ व्या वर्षी वानप्रस्थाश्रम या अटीच्या जवळ जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी कोण असणार, या मुद्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधून यावर अद्याप कोणीही तोंड उघडलेले नाही. वर्तमान समीकरणांप्रमाणे भाजपमध्ये मोदी यांच्यानंतर शहा यांचे स्थान आहे व त्यांचाच शब्द मोदींनंतर अंतिम मानला जातो. नड्डा अधिकृत पक्षाध्यक्ष असले तरी महत्वाच्या मुद्यांवर शहा यांनाच सूत्रे हाती घेण्यास सांगितले जाते हा अनुभव आहे. मात्र शहा मोदी यांचे पंतप्रधानपदाचे वारसदार ठरणार का, हा सवाल भाजपच्या अंंतर्गत वर्तुळात विचारला जातो. शहा यांची कार्यपध्दती पडद्यामागून काम करण्याची व सूत्रे हलविण्याची आहे. त्यांचे सडेतोड बोलणेही अनेक भाजप मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेत्यांना दुखावणारे ठरले आहे.

दुसरीकडे योगी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशासारखे राज्य भाजपने पुन्हा खेचून घेतल्याने त्यांच्या लोकप्रियतेचा ‘ग्राफ' चढा आहे. लोकसभेच्या विजयाची चावी मानल्या जाणाऱया उत्तर प्रदेशासारख्या राज्याची शक्ती त्यांच्या मागे आहे. अनेक राज्यांत मोदींनंतर योगी यांना प्रचारासाठी बोलविण्याची भाजप नेत्यांची मागणी असते. भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात योगी हा ‘फिट्ट' बसणारा चेहरा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

राष्ट्रपतीपदासाठी आनंदीबेन आघाडीवर

राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या जूनमध्ये आहे. त्या पदासाठी यूपीच्या सध्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचेही नाव आघाडीवर आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या आनंदीबेन यांना भाजपच्या नवीन रचनेत महत्वाचे स्थान आहे. त्या पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासू वर्तुळात दीर्घकाळापासून राहिलेल्या आहेत. शिवाय सध्या त्यांचे व योगी आदित्यनाथ यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आगामी राष्ट्रपतीपदी महिलाच असणार हे सूत्र भाजपने प्रत्यक्षात आणले तर द्रौपदी मुर्मू, सुमित्रा महाजन यांच्याबरोबर आनंदीबेन यांचेही नाव दिल्लीत चर्चेला आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com