योगींच्या शपथविधीवर अखिलेश म्हणतात, आम्ही बांधलेल्या स्टेडीयमवर शपथ घेताना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ogi Adityanath Akhilesh Yadav

योगींच्या शपथविधीवर अखिलेश म्हणतात, आम्ही बांधलेल्या स्टेडीयमवर शपथ घेताना...

लखनौ : उत्तर प्रदेशच्या राजकीय इतिहासात प्रथमच सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान भाजपचे नेते, बुलडोझर बाबा ऊर्फ योगी आदित्यनाथ यांनी मिळवला आहे. योगी आदित्यनाथ यांनी आज राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते, सेलिब्रिटीच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात पार पडलेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री म्हणून ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांनीही शपथ घेतली. योगी मंत्रिमंडळाचा चेहरा ब्राह्मण आणि ओबीसी यांचे मिश्रण ठेवण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वाने केला आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी योगी आदित्यनाथ यांना टोमणा मारला आहे.

हेही वाचा: अनिल परब म्हणाले, ३१ तारखेपर्यंत कामावर या; मग चर्चा

हेही वाचा: इम्रान खान यांच्यावरील अविश्‍वास ठराव स्थगित; सत्ता बचावाची धडपड सुरू

योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. ही शपथ त्यांनी लखनऊमधील भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडीयमवरुन घेतली आहे. याबाबतचा उल्लेख करत अखिलेश यादव यांनी म्हटलंय की, नव्या सरकारला सदिच्छा आहेत की त्यांनी समाजवादी पक्षाने बनवलेल्या स्टेडियमवरुन शपथ घेतली आहे. शपथ फक्त सरकार बनवण्याची नाही, तर जनतेची खरी सेवा करण्याची देखील घेतली पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. (Uttar Pradesh)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील विकासकामांवरुन श्रेयवादाचं राजकारण सुरु झालं होतं. या श्रेय वादात अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारला फटकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या पूर्वांचल एक्स्प्रेस वेसह अनेक विकास प्रकल्पांचे श्रेय भाजपने चोरल्याचा आरोप यादव यांनी केला होता.

सलग दुसऱ्यांदा यूपीचे महंत 'योगी'च!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत २७३ जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा भाजप आघाडीचे सरकार आज विराजमान झाले. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी काल योगी आदित्यनाथ यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सायंकाळी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यादरम्यान उपस्थित नागरिकांनी ‘भारत माता की जय’ योगी-मोदी झिंदाबाद घोषणा दिल्या. मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त ५२ मंत्र्यांनी शपथ घेतली. यात दोन उपमुख्यमंत्री, १६ कॅबिनेट, १४ स्वतंत्र प्रभार असलेले आणि २० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि सामूहिक फोटोही काढला. स्टेडियमधील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी अभिवादन केले. (Akhilesh Yadav)

ब्रजेश पाठक थेट उपमुख्यमंत्री

गेल्यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात दिनेश शर्मा हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. परंतु त्या जागी आता ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री केले आहे. ते यापूर्वीच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री होते. ब्राह्मण चेहरा म्हणून ओळखले जाणारे ब्रजेश पाठक यांनी लखनौ कॅन्टोन्मेंटमधून निवडणूक जिंकली आहे. २०१७ मध्ये पाठक यांनी बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी मध्य लखनौमधून निवडणूक जिंकली. २१ ऑगस्ट २०१९ च्या मंत्रिमंडळ विस्तारात योगी आदित्यनाथ यांनी पाठक यांना कायदा, विधी मंत्रालयाची जबाबदारी सोपवली. पाठक यांच्या राजकीय कारकिर्दीला १९८९ पासून सुरवात झाली. ते १९९० ला लखनौ विद्यापीठाचे अध्यक्ष झाले. २५ जून १९६४ रोजी हरदोई येथे जन्मलेले ब्रजेश पाठक हे वकील असून त्यांनी लखनौतून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे.

Web Title: Yogi Adityanath Govt Took Oath At Stadium Built By Samajwadi Party Akhilesh Yadav

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top