योगींची नजर आता 'गोमती रिव्हर फ्रंट'वर 

पीटीआय
शनिवार, 1 एप्रिल 2017

तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते 1 नोव्हेंबर 2016 रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते, हा प्रकल्प अद्याप अपूर्णच आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर 1 हजार 427 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'गोमती रिव्हर फ्रंट' या प्रकल्पातील गैरव्यवहाराच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून ही चौकशी केली जाणार असून, 45 दिवसांच्या आत याचा तपास अहवाल सादर करण्यात येईल. काही दिवसांपूर्वीच आदित्यनाथ यांनी 'गोमती रिव्हर फ्रंट'ला भेट देऊन या प्रकल्पाची पाहणी केली होती. या आदेशामुळे अखिलेश आणि समाजवादी पक्षाचे धाबे दणाणले आहेत. 

या प्रकल्पासाठी निर्धारित करण्यात आलेली रक्कम खूप जास्त असून, याचे सुधारित अंदाजपत्रक तयार केले जावे, असे निर्देश आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. गोमती नदी स्वच्छ व्हावी म्हणून योगी विशेष आग्रही आहेत, एवढा खर्च करूनही नदी अस्वच्छच का? सगळा पैसा काय दगडांवरच खर्च करण्यात आला आहे का, असा सवालही आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना केला होता. 

काम शिल्लक 
तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते 1 नोव्हेंबर 2016 रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते, हा प्रकल्प अद्याप अपूर्णच आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर 1 हजार 427 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून नदी किनाऱ्याचे सुशोभीकरण केले जाणार होते. अखिलेश यांच्या कार्यकाळामध्ये या प्रकल्पाचे अर्धे काम पूर्ण झाले असले, तरी अद्याप बरेच काम शिल्लक आहे.

Web Title: Yogi Adityanath orders to investigate scam in Gomati River Front project