उत्तर प्रदेशमधील पोलिस चकमकी थांबणार नाहीत : योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

गुन्हेगारांना कोण पाठीशी घालत होते, हे सर्वांना माहीत आहे. बाराशे चकमकींमध्ये 40 खतरनाक गुन्हेगारांना गोळ्या घालून मारण्यात आले आहे. अशी कारवाई या पुढेही सुरू राहील

लखनौ - गुन्हेगारांबद्दल विरोधकांना सहानुभूती दाखवित असल्याची टीका करीत उत्तर प्रदेशमधील पोलिस चकमकी थांबविण्यात येणार नाहीत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (गुरुवार) जाहीर केले.

विधान परिषदेत आज प्रश्‍नोत्तराच्या तासात बोलताना आदित्यनाथ यांनी विरोधकांना लक्ष्य केले. "गुन्हेगारांना कोण पाठीशी घालत होते, हे सर्वांना माहीत आहे. बाराशे चकमकींमध्ये 40 खतरनाक गुन्हेगारांना गोळ्या घालून मारण्यात आले आहे. अशी कारवाई या पुढेही सुरू राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दोन पोलिस चकमकीसह राज्यातील तीन प्रकरणांची "सीबीआय' चौकशी करण्याचे निर्देश अध्यक्ष रमेश यादव यांनी तीन दिवसांपूर्वी दिले आहेत. यासंबंधी भाजपचे आमदार देवेंद्र प्रतापसिंग यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, काही जणांना गुन्हेगारांबद्दल सहानुभूती वाटते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. लोकशाहीसाठी ही घातक गोष्ट आहे.

देवेंद्र प्रतापसिंग यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर विचार करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेच्या अध्यक्षांना केली. यावर बोलताना विरोधी पक्ष नेते अहमद हसन म्हणाले, ""संबंधित तिन्ही घटनांची "सीबीआय' चौकशी करण्याचा आदेश अध्यक्षांनी सरकारला यापूर्वीच दिला आहे. आता त्यावर हरकत घेणे योग्य आहे का?'' अध्यक्ष रमेश यादव यांनी याप्रकरणी निर्णय राखून ठेवला आहे.

Web Title: yogi aditynath uttar pradesh police