आक्रमक भाषा वापरण्याची सवय आपल्याला नाही - राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पुन्हा अध्यक्षपद नाही
राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार, या चर्चेने जोर पकडलेला असतानाच त्यांना पुन्हा अध्यक्ष होण्यात फारसा रस नसल्याचे त्यांनी पक्षाकडे स्पष्ट केल्याचे समजते. राहुल गांधी यांनी ज्या सक्रियपणे पुन्हा पक्षाचे कामकाज सुरू केल्यानंतर ते अध्यक्षपद लवकरच स्वीकारतील, अशी चर्चा सुरू झाली होती; परंतु स्वतः राहुल गांधी यांनीच याबाबत स्पष्ट खुलासा केल्याचे समजते.

नवी दिल्ली - पंतप्रधानांच्या संदर्भात ‘बेरोजगारीवरून युवक त्यांना दंडुक्‍यांनी मारतील’, अशी टिप्पणी किंवा ती भावना व्यक्त करण्यासाठीची काहीशी आक्रमक भाषा वापरण्याची सवय आपल्याला नाही; परंतु केवळ युवकांमधील असंतोषाची तीव्रता व्यक्त करण्यासाठी आपण त्या शब्दांचा वापर केला, असे मत राहुल गांधी यांनी अनौपचारिकपणे आज व्यक्त केले. मात्र, नरेंद्र मोदी यांची भाषा व आचरण हे पंतप्रधानपदाला साजेसे नसल्याची टिप्पणीही त्यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संसदेत पत्रकारांबरोबरच्या अनौपचारिक वार्तालापात त्यांनी त्यांच्या ‘डंडा मार’ टिप्पणीवर बोलताना अशी भाषा वापरण्याची त्यांना सवय नाही आणि स्वभावही नाही, असे सांगतनाच युवकाच्या भावनांची तीव्रता व्यक्त करण्यासाठी तसे शब्द वापरले गेले, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या या भावनेचा पडसाद काँग्रेस प्रवक्‍त्यांच्या दैनंदिन वार्तालापात पडलेला आढळून आला. काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा तसेच लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनीदेखील राहुल यांच्या टिप्पणीचा अर्थ शब्दशः पंतप्रधानांना इजा व्हावी, असा नव्हता, असे त्यांचा बचाव केला.

शहरांत राहताय की उष्णतेच्या बेटावर? पुणे शहराबाबत IIT म्हणते...

दरम्यान, राहुल गांधी यांच्या प्रश्‍नाला उत्तर न देण्याचा आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांचा प्रकार अनुचित होता आणि एकप्रकारे राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य या नात्याने प्राप्त अधिकार व हक्कांचा भंग असल्याचे मत काँग्रेसने व्यक्त केले. याप्रकरणी काँग्रेसची भूमिका आक्रमक राहणार असून, सोमवारीदेखील सभागृहाचे कामकाज चालणार नसल्याचे संकेत चौधरी यांनी दिले. सध्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असून, समायोजन विधेयक संमत होणे अपेक्षित आहे; परंतु सभागृहात गोंधळ झाल्यास अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होणार नाही आणि समायोजन विधेयक गोंधळातच तहकूब केले जाण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You are not used to using aggressive language