शहरांत राहताय की उष्णतेच्या बेटावर? पुणे शहराबाबत IIT म्हणते...

वृत्तसंस्था
Friday, 7 February 2020

शहरांमध्ये शहरी उष्मा बेटांच्या पृष्ठभागाचे दिवसाचे तापमान दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढत असल्याचा पुरावा पहिल्यांदाच मिळाला.

कोलकता : भारतातील बहुतांश शहरांचे रूपांतर उष्णतेच्या बेटांमध्ये होत असल्याचे आढळून आले आहे. आयआयटी खरगपूरमधील संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासात अनेक शहरांमध्ये सर्व हंगामांत दिवसा व रात्रीही उष्मा जाणवत असल्याचे दिसून आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयआयटी खरगपूरमधील 'सेंटर फॉर ओशन्स, रिव्हर्स, ऍटमॉस्फिअर अँड लॅंड सायन्सेस' (कोराल) या केंद्रातील संशोधक आणि त्यांचा स्थापत्य आणि प्रादेशिक नियोजन विभागाने यासंबंधी अभ्यास केला आहे. दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बहुतेक मोठ्या शहरांमध्ये दिवसाच्या तापमानात वाढ झाल्याची नोंद झाली. त्याचप्रमाणे रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याचे निदर्शनास आले.

- Coronavirus : कोरोनामुळे मिरची उत्पादक हैराण!

उपनगरांच्या तुलनेत शहरी भागात जास्त उष्णता जाणवत असल्याचे 'अंथ्रोपोजेनिक फोर्सिंग एक्‍झसरबेटिंग द अर्बन हिट आयर्लंड इन इंडिया' या शीर्षकाच्या या संशोधनात आढळले आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणेच उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता असते, असे निरीक्षण 'आयआयटी- केजीपी'च्या अहवालात नोंदविले आहे. 

भारतातील शहरी उष्मा बेटांसंदर्भात (यूएचआय) आमचे संशोधन तपशीलवार असून, त्याचे विश्‍लेषण काळजीपूर्वक केलेले आहे. यात 2001 ते 2017 या काळातील 44 मोठ्या शहरांमधील नागरी आणि जवळपासच्या ग्रामीण भागातील जमिनीच्या पृष्ठभागावरील तापमानातील फरक मोजण्यात आला आहे, अशी माहिती संशोधक प्रा. अरुण चक्रवर्ती यांनी दिली.

- हिंगणघाट प्रकरण : आनंद महिंद्रा पीडिता आणि कुटुंबीयांच्या पाठीशी!

ते म्हणाले, ''उपग्रह तापमान मापनपद्धतीचा वापर करून मॉन्सून आणि त्यानंतरच्या काळातील तापमानाचा अभ्यास केला असता बहुतेक शहरांमध्ये शहरी उष्मा बेटांच्या पृष्ठभागाचे दिवसाचे तापमान दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढत असल्याचा पुरावा पहिल्यांदाच मिळाला.'' 

हरित पुण्याचा उल्लेख 

पुणे, कोलकता आणि गुवाहाटी अशा शहरांच्या परिसरातील उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात हिरवाई आहे. अशा भागात शहरी भागापेक्षा दिवसा थंडावा जाणवतो. यावरून शहराच्या अवतीभवती आणि सीमा भागात जास्त हरित जागा असल्यास शहर आणि शेजारील प्रदेशातील तापमान कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती या अहवालाचे सहलेखक प्रा. जयनारायणन कुट्टीप्पुरर्थ यांनी दिली. 

- राम मंदिर ट्रस्टमधील एकमेव दलित सदस्य आहेत तरी कोण?

'यूएचआय'चा परिणाम कमी करण्यासाठी... 

- शहरांभोवतीच्या जलसाठ्यांचे संवर्धन करणे 
- हरित परिसराचा विस्तार करणे 
- इमारत बांधणी आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीत पर्यावरणपूरक साधनसामग्रीचा वापर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IIT Kharagpur warns about most cities in India turning into Urban Heat Islands