esakal | उत्तर प्रदेश : कासावीस झालेल्या रुग्णांना त्यानं पुरवला ऑक्सिजन; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

बोलून बातमी शोधा

Oxygen
उत्तर प्रदेश : कासावीस झालेल्या रुग्णांना त्यानं पुरवला ऑक्सिजन; पोलिसांनी दाखल केला गुन्हा
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

लखनऊ : देशात कोरोनाच्या उद्रेकामुळे लोकांचा ऑक्सिजनसाठी जीव कासावीस झाला आहे. या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच समोर आलं आहे. उत्तर प्रदेशात ही घटना घडली आहे. पोलिसांनी संबंधीत तरुणावर अनेक कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

जौनपूर येथे अनेक वर्षांपासून रुग्णवाहिका चालवणाऱ्या विक्कीनं सांगितलं की, गुरुवारी त्यानं आपल्या रुग्णवाहिकेतून एका रुग्णाला सरकारी रुग्णालयात आणलं होतं. ही व्यक्ती एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती, तिथ त्याची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्याला सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. त्यानंतर या रुग्णाला सरकारी रुग्णालयात आणल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचं सांगत हात वर केले. तेव्हा विक्कीने या रुग्णाला रुग्णालयाच्या बाहेर झोपवलं. या रुग्णांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळं त्यानं रुग्णवाहिकेत ठेवलेला सिलिंडर घेऊन आला आणि रुग्णाला ऑक्सिजन दिला. रुग्णालयाच्या बाहेर इतरही अनेक रुग्ण होते. त्या रुग्णांनी देखील विक्कीला ऑक्सिजन देण्याची विनंती केली. तर त्यानं त्यांच्यासाठी देखील ऑक्सिजन सिलिंडर्स मागवले. विक्कीने यापूर्वी एका डॉक्टरच्या हाताखाली कम्पाउंडर म्हणूनही काम केलं होतं. त्यामुळे त्याला रुग्णाला ऑक्सिजन कसा दिला जातो याची माहिती होती. दरम्यान, रुग्णालयाच्या एका कर्मचाऱ्या रुग्णालयाबाहेर येत विक्कीकडे एका सिलिंडरची मागणी केली. त्याला विक्कीने नकार दिल्यानंतर त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला.

हेही वाचा: "विजयोत्सवांवर तात्काळ बंदी घाला"; निवडणूक आयोगाचे राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश

तर दुसरीकडे जिल्हा रुग्णालयाचे चीफ मेडिकल अधीक्षक डॉ. अनिल शर्मा यांचं म्हणणं आहे की, विक्की रुग्णालयात व्हिडिओ बनवत होता आणि प्रशासन आणि रुग्णालयावर आरोप करत होता. यानंतर विक्कीने हा व्हिडिओ एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर देखील पाठवला. त्यामुळे त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी विक्कीवर १८८ आणि २६९ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.