मोदींच्या 'कॅशलेस'ला तरुणाईचा पाठिंबा

महेश शहा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

विद्यालये आणि विद्यापीठांना ऑनलाइन ट्रान्सफर्स, चेक किंवा "आरटीजीए'च्या माध्यमांतून शुल्क घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. ऑनलाइन व्यवहारांवर आमचा भर आहे.
- एम. एन. पटेल, गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रोखरहित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी गुजरातची तरुणाई पुढे सरसावली असून, त्यात शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागांत जाऊन नागरिकांना डिजिटल तंत्रज्ञान शिकवण्याचा निर्धार या तरुणांनी केला आहे.

नोटाबंदीचा निर्णय मोदींनी गेल्या महिन्यात जाहीर केल्यानंतर देशभरात रोख रकमेची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या तरुणाईने रोजचे जास्तीत जास्त व्यवहार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय केला आहे. नोटाबंदीमुळे राज्यातील बहुसंख्य शिक्षण संस्थांनी रोखरहित व्यवहाराचे आवाहन केले असून, त्यावर भरही दिला आहे. खासगी आणि सरकारी शिक्षण संस्थांचा त्यात समावेश आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांतील तरुणांना ऑनलाइन व्यवहारांचे प्रशिक्षण देण्यामुळे नागरिकांमध्ये या व्यवहारांबाबत जागृती होईल, असे मत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे उपसंचालक अशोक परमार यांनी व्यक्त केले. विद्यार्थी आणि तरुणांनी जास्तीत जास्त व्यवहार रोखरहित करावेत आणि हे व्यवहार कसे करावेत याची माहिती ग्रामीण भागांतील किमान दहा कुटुंबांना द्यावी, असे आवाहन राज्याच्या मानवी साधनसंपत्ती आणि विकास मंत्रालयाने तरुणाईला केले आहे. मोबाईल बॅंकिंग आणि इंटरनेट बॅंकिंगची माहिती देणे यात अपेक्षित आहे.

व्यवहार जास्तीत जास्त पारदर्शक करण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना "स्मार्ट कार्ड' देणे सुरू केले आहे. या कार्डात असलेल्या "पिन' क्रमांकामुळे संबंधित विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात कार्डद्वारे रक्कम भरू शकेल. "कॅंटीनमध्ये जेवण असो किंवा स्टेशनरीची खरेदी; माझ्या स्मार्ट कार्डाचा मी जास्तीत जास्त वापर करतो. रोख रक्कम जमा करण्यासाठीही मी हे कार्ड वापरतो,' अशी माहिती "सीईपीटी' विद्यापीठातील विद्यार्थिनी धवनी शहा हिने दिली. विद्यार्थ्यांच्या मदतीला बॅंकाही आल्या आहेत. विद्यापीठांत अनेक ठिकाणी "स्वाइप' यंत्रे ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना सोईचे झाले आहे.

Web Title: youth support to narendra modis cashless facility