झाकीर नाईक याच्या संस्थेची न्यायालयात धाव...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

केंद्र सरकारने दहशतवादविरोधी कायद्यामधील कलमांतर्गत गेल्या 15 नोव्हेंबर रोजी नाईक याच्या स्वयंसेवी संस्थेवर बंदी घातली होती. नाईक हा यानंतर भारतामध्ये आलेला नाही

नवी दिल्ली - इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या स्वयंसेवी संस्थेने केंद्र सरकारकडून या संस्थेवर लादण्यात आलेल्या बंदीस आज (शुक्रवार) दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. संस्थेची फिर्याद दाखल करुन घेत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारने यासंदर्भातील पुरावा सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता येत्या मंगळवारी होणार आहे.

केंद्र सरकारने दहशतवादविरोधी कायद्यामधील कलमांतर्गत गेल्या 15 नोव्हेंबर रोजी नाईक याच्या स्वयंसेवी संस्थेवर बंदी घातली होती. यानंतर संस्थेच्या मुंबई येथील कार्यलयावर राष्ट्रीय तपास संस्थेने गेल्या 19 नोव्हेंबर रोजी छापा घातला होता. दहशतवादी कृत्यांसाठी मुसलमान तरुणांना फूस देण्याच्या मुख्य आरोपांतर्गत नाईक याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस दलानेही गुन्हा दाखल केला आहे. नाईक याने दहशतवादाच्या समर्थनार्थ चिथावणीखोर भाषणे केल्याचे गृह मंत्रालयाचे निरीक्षण आहे.

याशिवाय, गेल्या डिसेंबर महिन्यात नाईक याच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हाही सक्तवसुली संचलनालयाकडून दाखल करण्यात आला होता. नाईक हा यानंतर भारतामध्ये आलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर, या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात घेतलेली ही धाव अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

Web Title: Zakir Naik's NGO approaches Delhi HC against ban