सीईटी परीक्षेची गुणपद्धती जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

  • अकरावी बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित परीक्षा 
  • गणिताचा पेपर 100 गुणांचा तर अन्य दोन विषय हे 50 गुणांचे असणार 

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेची गुणपद्धती जाहीर केली आहे. ही परीक्षा अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही ही परीक्षा ऑनलाइन होणार असून गणिताचा पेपर 100 गुणांचा तर अन्य दोन विषय हे 50 गुणांचे असणार आहेत. 

आयआयटीच्या विद्यार्थ्यांना एक कोटीचं पॅकेज

सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येते. गणिताचा पेपर 100 गुणांचा असणार आहे. यामध्ये अकरावीच्या अभ्यासक्रमावर आधारित 10 गुण आणि बारावीच्या अभ्यासक्रमावर 40 गुणांचे प्रश्‍न विचारण्यात येणार आहेत. या पेपरचा प्रत्येक प्रश्‍न 2 गुणांचा असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका सोडवण्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र 50 गुणांचे असणार आहेत. यातही अकरावीच्या अभ्यासक्रमावर आधारित 10 गुणांचे प्रश्‍न आणि बारावीच्या अभ्यासक्रमावरील 40 गुणांचे प्रश्‍न असतील. या विषयांना प्रत्येक प्रश्‍नांसाठी 1 गुण आहे.

महाविद्यालयांत व्यायामशाळा

जीवशास्त्र आणि जीवशास्त्र (प्राणीशास्त्र) विषयासाठी 50 गुणांचा पेपर असेल यासाठीही 10:40 असाच पॅटर्न असणार आहे. यंदा एप्रिल मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी गुण पद्धत कशी असणार यासंदर्भातील अधिसूचना संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही गटांमधून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पर्सेन्टाईल गुण काढताना त्याच गटातील भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र या दोन विषयांचे गुण त्या त्या गटात ग्राह्य धरले जाणार आहेत. गटांतील विषयांची विभागणी होणार नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The exam pattern of the CET exam is announced