आयआयटीच्या विद्यार्थ्यांना एक कोटीचे "पॅकेज' 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 December 2019

आयआयटी मुंबईमध्ये 1 डिसेंबरपासून सुरू असलेल्या "कॅम्पस इंटरव्ह्यू'च्या पहिल्या टप्प्यात तब्बल एक हजार 172 विद्यार्थ्यांना 265 कंपन्यांमध्ये लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत.

मुंबई - आयआयटी मुंबईमध्ये 1 डिसेंबरपासून सुरू असलेल्या "कॅम्पस इंटरव्ह्यू'च्या पहिल्या टप्प्यात तब्बल एक हजार 172 विद्यार्थ्यांना 265 कंपन्यांमध्ये लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांना परदेशी कंपन्यांकडून वर्षाला 1.64 लाख डॉलरचे (अंदाजे एक कोटी 16 लाख 63 हजार 270 रुपये) "पॅकेज' देण्यात आले. देशांतर्गत कंपन्यांनी वार्षिक 62 लाख 28 हजार रुपये वेतन दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी अभ्यासक्रमातील विद्यार्थी सर्वाधिक वेतनाचे लाभार्थी ठरले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्या टप्प्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. 

वाढत्या प्रतिसादामुळे मुलाखतीची मुदत यंदा 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीमध्ये 265 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मुलाखत झालेल्या एक हजार 319 विद्यार्थ्यांमधून 1172 जणांची निवड झाली. मुलाखत होण्यापूर्वीच 116 विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात आली, तर एक हजार 56 जणांची मुलाखतीनंतर निवड झाली. पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या 265 कंपन्यांपैकी 156 कंपन्या परदेशांतील होत्या. त्यांच्यात अमेरिका, जपान, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, नेदरलॅंड, हॉंगकॉंग, तैवान, दक्षिण कोरिया या देशांतील कंपन्यांचा समावेश होता. 

या वर्षी "कॅम्पस प्लेसमेंट'मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरासरी 20.34 लाख रुपये वार्षिक वेतन मिळाले. पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक 21.24 लाख रुपये सरासरी वार्षिक पगार मिळाला. त्याखालोखाल माहिती तंत्रज्ञान/ सॉफ्टवेअर क्षेत्रात 21 लाख, ऍनालिटिक्‍समध्ये 16.92 लाख, संशोधन आणि विकास क्षेत्रात 27.42 लाख, कन्सल्टिंगमध्ये 14.44 लाख असे वेतन देण्यात आले. 

कल चाचणी 
मुलाखतीच्या वेळी उमेदवारांवर प्रचंड ताण येतो. हा ताण कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आयआयटी मुंबईने नोकरीविषयक समान कल चाचणी घेतली. त्यामुळे मनावरील ताण कमी झाल्याचे अनेक जणांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One crore package for IIT students