10th & 12th Board Preparation: अभ्यास नक्की किती वेळ करावा? विद्यार्थ्यांनो, जाणून घ्या या प्रश्नाचं सोपं उत्तर

10th & 12th Board Preparation know how many hours should students study
10th & 12th Board Preparation know how many hours should students study

नागपूर : दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा म्हटलं की सर्वांत आधी डोळ्यासमोर येतात तासं‍तास एकाच जागी बसून अभ्यास करणारे विद्यार्थी. ‘‘आता अधिक वेळ अभ्यासाची सवय लावून घ्या’’ असं अगदी वर्षाच्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना पालकांकडून किंवा शिक्षकांकडून सांगण्यात येतं. यामुळे अनेकदा मुलं परीक्षेपेक्षा अभ्यासाचंच अधिक टेन्शन घेतात. मात्र दिवसभरातून अभ्यास नक्की किती वेळ करावा? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मग विद्यार्थ्यांनो, अजिबात घाबरू नका. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

नक्की किती वेळ अभ्यास करावा?

सतत एकाजागी बसून तासंतास अभ्यास केला; तरच आपल्याला चांगले गुण मिळू शकतात, असा समज अनेक विद्यार्थ्यांचा असतो. मात्र अनेकदा १०-१२ तास अभ्यास केल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांच्या काहीच लक्षात राहत नाही. यामुळे त्यांचा वेळ वाया जातो. मात्र काही तासांच्या टप्प्यांमध्ये योग्य नियोजन करून आपण अभ्यास केला; तर २ तासांचा अभ्यासही मोठं यश देऊ शकतो. म्हणूनच अभ्यासाचं नियोजन महत्त्वाचं आहे.

असं करा अभ्यासाचं योग्य नियोजन -

दिवसभरातील वेळेचं नियोजन करा

अभ्यासाच्या वेळांचं नियोजन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या दिवसभरातील वेळेचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुमची शाळा, ट्यूशन क्लासेस, खेळांचे क्लासेस यानंतर तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे ते बघा. साधारणतः तुम्ही झोपतपर्यंत तुमच्याकडे ६ ते ८ तास शिल्लक असतात. यावेळेत अभ्यासाचं नियोजन करा. नियोजनातील काही वेळ इतर कामांसाठीही ठेवा.

दिवसभरातील अभ्यासाचा वेळ वाटून घ्या

सुटीच्या दिवशी शाळा, क्लासेस यापैकी काहीच नसतं. त्यामुळे तुम्ही संपूर्ण २४ तास घरीच असता. मात्र आपल्याला रोजपेक्षा अधिक वेळ मिळाला आहे म्हणून सलग ७ ते ८ तास अभ्यास करू नका. तुमचा दिवसभरातील संपूर्ण वेळ २-२ तासांच्या टप्प्यांमध्ये वाटून घ्या. म्हणजेच अभ्यासाबरोबरच इतरही गोष्टींना वेळ द्या. सलग २ तास अभ्यास करा, त्यानंतर खेळा किंवा टीव्ही बघा. यानंतर पुन्हा काही वेळानं अभ्यास करा.

अभ्यासाच्या वेळी अभ्यासच

तुमचा वेळ टप्प्यांमध्ये वाटून घेतला की, तुमच्या अभ्यासाच्या वेळा काटेकोरपणे पाळा. अभ्यास करताना फक्त आणि फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करा. यावेळी टीव्हीवर काय चालू असेल किंवा कुटुंबातील व्यक्ती कोणाशी काय बोलत आहेत, याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तसंच अभ्यासाच्या वेळी तुमच्या जवळचे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बंद करून ठेवा किंवा खोलीच्या बाहेर नेऊन ठेवा.

एकाच विषयात अडकून राहू नका

बरेचदा अभ्यास करताना भरपूर वेळ निघून जातो; मात्र आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं समजण्यास अडचण होत असते. मात्र तरीही आपण तोच विषय वाचत असतो. असं करू नका. जर तुम्हाला कुठला विषय समजत नसेल; तर त्या विषयाच्या मागे तासंतास वाया घालवू नका. लगेच दुसरा विषय हाती घ्या, पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुम्हाला तासंतास अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. तसंच तुमचा वेळही वाया जाणार नाही.

माइंड रिफ्रेश करा

अभ्यास करताना अनेकजण ८ ते १० तास सलग अभ्यास करतात. मात्र यामुळे तुमचं शरीर आणि मेंदू थकतो. त्यामुळे अभ्यासादरम्यान ब्रेक्स घेण्याच्या पद्धती नक्की आत्मसात करा.

लवकर झोपून लवकर उठा

अनेकांना अभ्यास करताना रात्रभर जागत बसण्याची सवय असते. रात्रीच्या शांततेच्या वातावरणात अभ्यास होतो, असेही अनेकजण सांगतात. मात्र हे तुमच्या प्रकृतीच्या दृष्टीनं घातक ठरू शकतं. त्यामुळे शक्य असल्यास रात्री १० नंतर अभ्यास करू नका. त्यापेक्षा पहाटे लवकर उठून अभ्यास करा. पहाटेचा अभ्यास नेहमी लक्षात राहील.

एकूणच काय तर बोर्डाच्या परीक्षांचं टेन्शन घेऊन १०-१२ तास सलग अभ्यास करण्यापेक्षा वेळेचं नियोजन करून कमी वेळ अभ्यास केला; तरी चांगले मार्क्स मिळू शकतात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com