Teacher Recruitment : राज्यातील शाळांमध्ये ११ हजार नवीन शिक्षकांची भरती

राज्यात गेल्या २० वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा रविवारी रात्री उशिरा पूर्ण करण्यात आला.
teachers recruitment
teachers recruitmentSakal

पुणे - राज्यात गेल्या २० वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा रविवारी रात्री उशिरा पूर्ण करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील शाळांमध्ये मुलाखतीशिवाय जवळपास ११ हजार नवीन शिक्षकांची भरती झाली आहे. त्यामुळे गेल्या १० ते १२ वर्षांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या काही उमेदवारांची शिक्षक म्हणून भरती झाली आहे.

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२ नुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून ५ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत प्राधान्यक्रम घेण्यात आले होते.

त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील आणि मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील रिक्त जागांसाठी उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली आहे. मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, ‘पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही प्रभावाखाली न येता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना समाज माध्यमांवर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले. तसेच अभियोग्यताधारकांच्या व्यक्तिगत संदेशांना सुद्धा उत्तर देण्यात आली.

या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास कोणासही संधी मिळू नये, यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांचे फोन रेकॉर्ड करावेत, फोटो ठेवावेत आणि अशांविरुद्ध थेट पोलिस तक्रार करावी, असे खुले आवाहन केले होते. अभियोग्यताधारकांना संभ्रमित करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या गेल्या.’

या प्रक्रियेदरम्यान काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्याचे मंत्रालय स्तरावरून शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी तातडीने आणि प्रगल्भतेने निराकरण केल्यामुळे प्रक्रिया पुढे नेणे सुकर झाल्याचे मांढरे यांनी सांगितले. या भरती प्रक्रियेतून निवड झालेले नवीन शिक्षक हे विद्यार्थी घडविण्याच्या कामात त्यांचे पूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा असल्याचे मांढरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com