Shala Purv Tayari Abhiyan Pahile Paul 2023 : शाळा पूर्वतयारीसाठी यंदाही ‘पहिले पाऊल’; दीपक केसरकर

राज्यभरात मोहीम; केसरकर यांची माहिती
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar esakal
Updated on

मुंबई : शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी, या विचाराने राज्यात ‘पहिले पाऊल- शाळा पूर्वतयारी अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील ६५ हजार शासकीय शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात येत्या जूनमध्ये पहिले पाऊल टाकणाऱ्या सुमारे १५ लाख मुलांची शाळापूर्व तयारी करून घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.

या मोहिमेच्या निमित्ताने बालकांच्या तयारीसाठी विकसित केलेले साहित्य माता गटांना एकाच वेळेत देता यावे, यासाठी राज्यातील सर्व ६५ हजार शासकीय शाळांमध्ये शाळा पूर्व तयारीचे पहिले मेळावे २३ ते ३० एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. तसेच दुसरे मेळावे जून महिन्यात घेण्यात येतील. शाळापूर्व तयारी मेळावे मोठ्या प्रमाणात आयोजित करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

तसेच मागील वर्षी माता गटांच्या, शाळांच्या तसेच समाजाच्या भरघोस प्रतिसादामुळे या मोहिमेला चांगले यश मिळालेले आहे. मोहिमेनंतर केलेल्या सर्वेक्षणात पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक तसेच भावनिक गुणवत्तेत सरासरी ४० टक्क्यांहून अधिक प्रगती झालेली दिसली. यंदा यंत्रणा अधिक सज्ज असून मागील वर्षापेक्षाही जास्त प्रगती दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आतापर्यंत ३५ जिल्हे, २८९ ब्लॉक, ७९४ केंद्राच्या स्तरावर प्रशिक्षण सत्र पार पडले आहे. यामध्ये ८१ हजार ७६८ अधिकारी आणि शिक्षक सहभागी झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या अभियानात पालकांनी तसेच गावातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद, गावातील तरूण स्वयंसेवक यांनी देखील या कामी सहकार्य करावे, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.

२.६ लाख माता-गटांची स्थापना

मोहिमेच्या माध्यमातून राज्यभर जवळपास २.६ लाख माता-गटांची स्थापना करण्यात आली आहे. तेच या अभियानाला पुढे घेऊन जात आहेत. या अभियानात अंगणवाडी सेविकांचेदेखील मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्यामार्फत आणि ‘प्रथम’ या संस्थेच्या सहकार्याने प्रशिक्षण दिल्यानंतर जिल्हा, तालुका आणि ब्लॉक स्तरावर या मोहिमेसाठी उत्तम प्रशिक्षण व अंमलबजावणीची तयारी झाली आहे.

- दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com