विशेष : भूशास्त्र - संधी आणि आव्हाने

भूशास्त्र हा विषय पृथ्वी आणि तिचे निसर्गात दिसणारे गुणधर्म यांच्याशी निगडित असल्याने अध्ययनाची प्रक्रिया माता पृथ्वीच्या सहवासातच सुरू केली जाते.
Geology
GeologySakal

भूशास्त्रविषयक कामासाठी आवश्यक असलेले काही बिगर-शैक्षणिक गुण

  • ‘भूशास्त्र’ या विषयाची तीव्र आवड

  • काल्पनिक चित्र उभे करण्याची क्षमता

  • चांगली वैज्ञानिक/तांत्रिक कौशल्ये

  • एक शोधक म्हणून साहसी स्वभाव

  • शारीरिक तंदुरुस्ती, स्वयंपूर्णता व उपलब्ध संसाधने कल्पकतेने वापरण्याची क्षमता (रिसोर्सफुलनेस)

  • सांख्यिकी तसेच आलेखाच्या स्वरूपातील माहितीचा अन्वयार्थ लावण्याची क्षमता

  • तपशिलांकडे अवधान पुरवणे

  • अहवाल लेखन कौशल्य

क्षेत्रभेटी

भूशास्त्र हा विषय पृथ्वी आणि तिचे निसर्गात दिसणारे गुणधर्म यांच्याशी निगडित असल्याने अध्ययनाची प्रक्रिया माता पृथ्वीच्या सहवासातच सुरू केली जाते. म्हणूनच प्रत्येक पदवी अभ्यासक्रमाचा क्षेत्रीय काम हा अविभाज्य भाग आहे. यामध्ये भूशास्त्रीय माहितीचे संकलन, खडक/क्षारांच्या नमुन्यांचे संकलन, मोजमाप विभाग तयार करणे, भूशास्त्रीय रचना/पोतांचा अर्थ लावणे आणि भूशास्त्रीय मॅपिंगचा समावेश होतो.

भूशास्त्र आणि पर्यावरण

पर्यावरणाची स्वच्छता राखण्यात तसेच संवर्धनात भूशास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, कारण ते पृष्ठभागावरील/उपपृष्ठभागांवरील पाणी, माती यांच्या दर्जाचे मूल्यमापन करतात तसेच नैसर्गिक आपत्ती व त्यांचे परिणाम यांचाही अभ्यास करतात. भूपृष्ठावरील तसेच उपभूपृष्ठांवरील पाण्यातील प्रदूषण, त्यामागील कारणे, स्रोत, मानवी आरोग्यावर होणारा त्याचा परिणाम यांचा अभ्यास करणे तसेच अन्य काही उपाय सुचवले गेले. भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखी, ग्लेशिअल लेक आउटबर्स्ट फ्लड (जीएलओएफ) आणि सुनामी यांसारख्या भूशास्त्रीय आपत्तींचे मूल्यमापन भूशास्त्रज्ञ करतात तसेच आपत्ती व्यवस्थापन योजनेत अधिक कार्यक्षमतेने उपाय सुचवतात.

भूशास्त्र व इंजिनिअरिंगची सांगड

इंजिनिअरिंग प्रकल्पांमध्ये भूशास्त्रज्ञांची भूमिका अपरिहार्य ठरते. पाटबंधारे प्रकल्प, औष्णिक/जल/अणू ऊर्जाप्रकल्प तसेच पूल, बोगदे, रस्ते आदी दळणवळण प्रकल्पांमध्ये इंजिनिअर्स व भूशास्त्रज्ञांना एकत्रितपणे काम करावे लागते. प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरला भूशास्त्राच्या ज्ञानासह सुसज्ज राहणे भाग असते. जिओ टेक्निकल अँड जिओ एन्व्हॉर्न्मेंटल, हायड्रोलिक्स, स्ट्रक्चर आणि ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये भूशास्त्रीय सिद्धांतांचे व्यापक उपयोजन दिसून येते. कोणत्याही इमारतीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी इंजिनिअरला माती किंवा खडकाच्या पायाचे गुणधर्म निश्चित करावे लागतात. बांधकाम स्थिर राहावे याची काळजी घेण्यासाठी इंजिनिअर्स भूशास्त्रज्ञांसोबत काम करतात आणि बांधकाम स्थळावरील पायाचा प्रकार निश्चित करतात. विकसित देशांमध्ये कोणताही मोठा बांधकाम प्रकल्प सुरू करण्यापूर्वी स्थळाचा भूशास्त्रीय अहवाल सादर करणे सक्तीचे आहे.

भूशास्त्रातील विविध संधी

भूशास्त्र तुम्हाला कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार करते. संसाधन व्यवस्थापनापासून ते पर्यावरण संरक्षणापर्यंत आणि क्षार व तेल शोधण्यापर्यंत कोणतेही आव्हान या विषयामुळे स्वीकारता येते, कारण या विषयाच्या अभ्यासाद्वारे अनेक क्षेत्रातील कौशल्ये संपादन केली जातात. याच कारणामुळे भूशास्त्रज्ञ इंजिनिअरिंग आणि कन्सल्टिंग फर्म्समध्ये काम करू शकतो, सरकारी यंत्रणांमध्ये काम करू शकतो. खाणकाम कंपनी, भूजल कंपन्या, पेट्रोलियम कंपन्या, म्युझिअम्स आदी ठिकाणीही भूशास्त्रज्ञ काम करू शकतात. ते भूशास्त्र हा वैकल्पिक विषय निवडून प्रशासकीय सेवांच्या परीक्षाही देऊ शकतात. हा विषय अन्य विषयांच्या तुलनेत स्कोअरिंग समजला जातो. अखेरीस फ्रीलान्सिंगमधील संधी तर इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी उपलब्ध आहेतच.

दुसरी बाजू

प्रत्यक्ष क्षेत्रावर भूशास्त्रज्ञ म्हणून काम करताना तुमची शक्य त्या सर्व प्रकारे परीक्षा बघणाऱ्या परिस्थिती निर्माण होतील. प्रकल्पाच्या आवश्यकतांनुसार दुर्गम प्रदेशात काम करण्यासाठी तसेच व्यापक प्रवासासाठी तयार राहा. काही परिस्थितीत तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता, तुम्हाला दुखापत होऊ शकते. त्यावेळी तुम्ही कदाचित शहरी वस्त्यांपासून दूर असाल, मदत मिळण्याची शक्यता कमी असेल. त्याचप्रमाणे पुरेशा तयारीशिवाय असुरक्षित प्रदेशांत (भूकंपप्रवण, पूरप्रवण) काम करणे धोकादायक ठरू शकेल. क्षेत्रावरील कामादरम्यान येणाऱ्या सर्व संभाव्य समस्यांचा सामना भूशास्त्रज्ञानाला करणे भाग असते. तात्पर्य म्हणजे, तुम्हाला भूशास्त्रज्ञ व्हायचे असेल तर तुम्हाला साहसांची आवड हवी, कामाप्रती कळकळ हवी आणि तुमच्या विषयावर तुमचे प्रेम हवे.

भूशास्त्रज्ञांना नोकऱ्या देणाऱ्या संस्था (राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय) पुढीलप्रमाणे

  • भारतीय भूशास्त्रीय सर्वेक्षण (जीएसआय)

  • केंद्रीय भूजल मंडळ (सीजीडब्ल्यूबी)

  • भूशास्त्र व खाणकाम संचालनालय (डीजीएम)

  • भारतीय खाणकाम कार्यालय (आयबीएम)

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)

  • भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)

  • राष्ट्रीय भूभौतिकशास्त्र संस्था (एनजीआरआय)

  • वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी, डेहराडून

  • भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी)

  • ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी)

  • राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ (एनएचपीसी)

  • राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ (एनटीपीसी)

  • मिनरल्स अँड मेटल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एमएमटीसी)

  • राष्ट्रीय दूरस्थ संवेदक एजन्सी (एनआरएसए)

  • स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन (एसएमसी)

  • टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (टिस्को)

  • राष्ट्रीय क्षार विकास महामंडळ (एनएमडीसी)

  • नाल्को

  • हिंदुस्तान झिंक लिमिटेड

  • भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)

  • टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (टीएचडीसी)

  • क्षार शोध प्राधिकरण खासगी क्षेत्रातील कंपन्या

  • ब्रोकन हिल

  • रिओ टिंटो

  • डी बीअर्स

  • कैर्न एनर्जी

  • रिलायन्स एनर्जी

  • शेल

  • शुलुंबर्गर

- आशिषकुमार नाथ, संचालक व जनसंपर्क अधिकारी, भारतीय भूशास्त्रीय सर्वेक्षण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com