भारत आता कल्पनांनी जगावर वर्चस्व गाजविणार

अभय जेरे
Thursday, 2 January 2020

इनोव्हेशन आणि उद्योजकीय संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवायला हवे. भारताला जगावर वर्चस्व गाजवणाऱ्या कल्पना आणि व्यवसायाची गरज आहे. सव्वा कोटी भारतीयांच्या मदतीने हे खरोखरच शक्य आहे.

नवं काही
सध्या आर्थिक मंदीच्या बातम्यांनी प्रसारमाध्यमांचे अवकाश व्यापलेय. आगामी ५० वर्षांमध्ये विनाअडथळा शाश्‍वत आर्थिक विकासाचे ध्येय गाठायचे असल्यास आपल्याला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याची गरज आहे. इनोव्हेशन आणि उद्योजकीय संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवायला हवे. भारताला जगावर वर्चस्व गाजवणाऱ्या कल्पना आणि व्यवसायाची गरज आहे. सव्वा कोटी भारतीयांच्या मदतीने हे खरोखरच शक्य आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महान संकल्पना समाजाच्या कोणत्याही घटकातून येऊ शकतात. ज्यांना जागतिक संदर्भ असू शकतो. आपल्याला केवळ गरज आहे, ती अशा संकल्पनांना खतपाणी घालणाऱ्या, त्यांना तर्कशुद्धरीत्या पुढे नेणाऱ्या सक्षम यंत्रणेची. सध्या भारतात ६५ टक्के लोकसंख्या तरुण असून, युवा मने मात्र ‘इनोव्हेशन’च्या दृष्टीने पद्धतशीरपणे प्रशिक्षित केली जात नाहीत. पालक, शिक्षक आणि समाजाकडून नावीन्यपूर्ण संकल्पना संपविल्या जातात. युवकांव्यतिरिक्त आपण पालक, शिक्षकांनाही ‘इनोव्हेटिव्ह’ संकल्पनांना पाठिंबा देण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अपयश ‘साजरे’ करण्याविषयीही प्रशिक्षित करायला हवे. त्यातून समाजात धोका स्वीकारण्याची वृत्ती वाढेल. यासाठी मोठ्या सांस्कृतिक बदलाबरोबरच मानसिकतेतही लक्षणीय बदल व्हायला हवा. हे व्यापक जागृती, विशेषत: तळागाळातील जागरूकतेतून घडू शकेल. या प्रक्रियेत ‘सकाळ’सारख्या प्रादेशिक भाषेतील प्रसारमाध्यमाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मराठीतील सर्वाधिक प्रगतिशील प्रसारमाध्यम असणाऱ्या ‘सकाळ’ची अनेक नव्या कल्पनांना जन्म देण्याची मोठी परंपरा आहे.

हेही वाचा : मुलांनो 2020 आलंय; करिअर घडविण्यासाठी हे कराच!

नव्याने सुरू होत असलेल्या या पुरवणीतही इनोव्हेशन, उद्योजकता, कौशल्यविकास आणि स्टार्टअपशी संबंधित उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. करिअरच्या पारंपरिक पर्यायांपलीकडे पाहू इच्छिणाऱ्या युवकांना त्यातून प्रोत्साहन मिळेल. ‘सकाळ’चा समाज व सरकारवर प्रभाव पाडण्याची क्षमता पाहता महाराष्ट्र या क्षेत्रांत इतरांचे नेतृत्व करेल, असा माझा विश्‍वास आहे. 

या पुरवणीत सक्सेस स्टोरीजसह मोठ्या अपयशांबद्दलही मी लिहीन. त्यातून इतरांना शिकता येईल. आपण स्टार्टअपशी संबंधित उपक्रम आणि इनोव्हेशनला चालना देण्यासाठी विविध सरकारी योजना, निधी, सल्लागार यंत्रणा आदींवरही चर्चा करू. यात वाचकांनीही आपल्या सक्सेस स्टोरी किंवा अपयशाबद्दल सांगावे, अशी माझी विनंती आहे. त्यांचा इतरांनाही फायदा होईल.

हेही वाचा : अमेरिकेत शिकायला घाबरू नका, या आहेत ईझी स्टेप्स

(लेखक मनुष्यबळ विकास मंत्रालयात चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhay jere article about Innovation