‘ॲक्टिव्ह लर्निंग’ आणि ‘स्मार्ट वर्क’ महत्त्वाचे!

पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीत मी स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागतो. तेथे मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले.
Vaibhav Kajale
Vaibhav Kajalesakal

- वैभव काजळे, आयएएस, सहाय्यक जिल्हाधिकारी - पाटणा

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेलं किल्ले शिवनेरी आणि जुन्नर परिसर हे आमचं मूळ गाव. माझी आई गृहिणी, वडील महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये क्लास वन ऑफिसर म्हणून निवृत्त झाले. मोठा भाऊ व वहिनी डॉक्टर आहेत. माझं शिक्षण पुण्यात झालं. आयएएस व्हावं असं माझ्या डोक्यातही नव्हतं. शाळेत असल्यापासून मला फायटर पायलट होण्याची इच्छा होती. त्यासाठी मला एन.डी.ए.मध्ये जायचं होतं.

मात्र, चष्मा असल्याने माझी निवड झाली नाही. मग व्ही.आय.टी. महाविद्यालय, पुणे येथून मी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. तेथून २०१५-१६ मध्ये बी.टेक. (कॉम्प्युटर) झालो. पुणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांची काही व्याख्याने मी ऐकली. त्यातून आपणही प्रशासकीय सेवेत जावं, असं मला वाटू लागलं आणि आपण प्रयत्न करायचे, असं मी ठरवलं.

पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीत मी स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागतो. तेथे मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले. पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळालं आणि इंडियन कॉर्पोरेट लॉ या सेवेत माझी २०१७ मध्ये निवड झाली. दिल्लीत पुढची दोन वर्षे प्रशिक्षण झालं आणि त्यानंतर मुंबईतही नोकरीही सुरू झाली. मात्र, आयएएस होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळे मी प्रयत्न सुरू ठेवले. नंतर नंतर मी केवळ आयएएस आणि आयपीएस हाच पर्याय भरायचो. २०२२ मध्ये अखेर माझं स्वप्न पूर्ण झालं आणि मी आयएएस झालो. बिहार केडर मिळालं.

या प्रवासात आपलं उद्दिष्ट स्वतःशी स्पष्ट असणं आवश्‍यक आहे. कोणाचं तरी अनुकरण करून या खडतर प्रवासाला सुरुवात करू नका. अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती समजून घ्या. घोकंपट्टी करू नका. ‘ॲक्टिव्ह किंवा ऑगरॅनिक लर्निंग’ करा. समाजात आपण जे जे पाहतो, वाचतो, ते आपल्या जगण्याशी जोडण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे चालू घडामोडींचे तुमचे विश्‍लेषण खूप वेगळे ठरेल. याचा फायदा तुम्हाला मुलाखतीत खूप होतो.

कमीत कमी आणि महत्त्वाची साधने वापरा. भारंभार पुस्तके वाचू नका. तुमचे जे स्वप्न आहे, त्याचा रोज विचार करा. तसे वागा. मी आयएएस नसतानाही मी अधिकाऱ्यांसारखाच वागायचो, तसाच विचार करायचो. याचा सकारात्मक परिणाम होतो. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह न राहता ‘सोशली ॲक्टिव्ह’ राहा. रोज किती तास कसा अभ्यास केला? यापेक्षा रोज कसा अभ्यास केला? यावर भर द्या. प्रामाणिकपणे प्रयत्न करा. यश नक्कीच मिळेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com