पद ही मजा नव्हे, जबाबदारी!

आयएएस, आयपीएस म्हणजे कोणी तरी राजा किंवा एकदम मोठी व्यक्ती असा बागुलबुवा करणे कमी व्हायला हवे, असे माझे प्रामाणिक मत आहे.
Akshay Wakhare
Akshay Wakharesakal

- अक्षय वाखारे, आयपीएस - तमिळनाडू कॅडर

आयएएस, आयपीएस म्हणजे कोणी तरी राजा किंवा एकदम मोठी व्यक्ती असा बागुलबुवा करणे कमी व्हायला हवे, असे माझे प्रामाणिक मत आहे. जेवढे मोठे पद, तेवढी जास्त मजा असा समज लोकांमध्ये दिसतो. मात्र, जेवढे मोठे पद, तेवढी जबाबदारी जास्त हे सत्य आहे. आम्ही लोकसेवक आहोत, सरकारी कर्मचारी आहोत.

त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याने त्याचे काम नीट, वेळेत पूर्ण करणे हेच महत्त्वाचे आहे. आयएएस, आयपीएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच स्वतःची मानसिकता अशा पद्धतीने तयार करायला हवी.

पदाचे उदात्तीकरण करून त्याचा ताण न घेता कष्टाने तयारी करणे, अभ्यास करणे हेच यशस्वी होण्याचे सूत्र आहे. यासाठी ‘मला प्रशासकीय सेवेत का जायचे आहे?’ हा प्रश्‍न स्वतःला विचारा, त्याचे ठाम उत्तर शोधा आणि कामाला लागा. तुम्ही जेवढा वेळ अभ्यासिकेत बसता, त्याचे तास मोजण्यापेक्षा तुम्ही किती वेळ अभ्यास करता, हे मोजा. अनेक विद्यार्थी मी १२-१४ तास अभ्यास करतो असे सांगतात. मात्र, ते केवळ १२-१४ तास बैठक घालत असतात.त्यांचा अभ्यास किती होतो? हा प्रश्‍नच आहे.

यूपीएससीचा अभ्यासक्रम म्हणजे जे जे आपल्याला आजूबाजूला दिसते, ते सगळे असे म्हटले जाते. त्यामुळे केवळ पाठ्यपुस्तकांवर अवलंबून राहू नका. सतर्क राहा आणि आजूबाजूला काय घडते आहे? याचेही निरीक्षण करत राहा. एक गंमत सांगाविशी वाटते, प्रीलिमच्या आधी मला डेंगी झाला होता, तेव्हा ओडोमास लावताना मी एकदा सहज त्यावरची माहिती वाचली आणि त्यात ‘लेमन ग्रास’ असते हे लक्षात आले.

त्यानंतर माझ्या परीक्षेत नेमका हाच प्रश्‍न आला होता की, डासांना पळवून लावण्यासाठी काय वापरले जाते? त्यावेळी पर्यायात लेमन ग्रास होते. मी पटकन तो पर्याय निवडला. याचाच अर्थ असा की, आपण सहजपणे केलेली निरीक्षणेही फायदेशीर ठरतात. आपल्याला शाळेत शिकवल्या गेलेल्या सर्व विषयांच्या मूलभूत संकल्पना पक्क्या करणे, वारंवार आवृत्ती करणे आणि मागील वर्षांच्या प्रश्‍नपत्रिकांचा अभ्यास करणे यामुळे यश तुमच्या टप्प्यात येते.

नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यात नामपूर नावाचे आमचे एक छोटेसे गाव आहे. माझे डिप्लोमापर्यंतचे शिक्षण नाशिकला झाले. त्यानंतर २०१८ मध्ये सिंहगड कॉलेजला मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. मध्यंतरी एका अपघातात चेहऱ्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली.

मात्र, न डगमगता मी अभ्यास सुरू ठेवला. वडील नाशिकच्या ‘करन्सी नोट प्रेस’मध्ये सुपरवायजर म्हणून कार्यरत आहे. तेच माझी प्रेरणा आहेत. आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि त्यांच्या परीने सर्वतोपरी प्रोत्साहनही दिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी यशस्वी होऊ शकलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com