esakal | जपान आणि संधी : जपानमधील उच्च पदाच्या संधी
sakal

बोलून बातमी शोधा

जपान आणि संधी : जपानमधील उच्च पदाच्या संधी

जपानी शिकणाऱ्या अनेक उमेदवारांचा असा प्रश्न असतो, की मी भारतात किंवा जपानमध्ये जपानी कंपनीत काम नक्की करू शकेन किंवा करत आहे; पण मला त्या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये काम करता येईल का? मी स्वतः जपानमध्ये कंपनीच्या सीईओ आणि सीएफओबरोबर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केले आहे. मी कॉम्पुटर इंजिनिअर आहे, मला जपानी भाषा येते, मी एमबीएसुद्धा केले, याचा मला नक्कीच उपयोग झाला आहे.

जपान आणि संधी : जपानमधील उच्च पदाच्या संधी

sakal_logo
By
सुजाता कोळेकर, जपान

जपानी शिकणाऱ्या अनेक उमेदवारांचा असा प्रश्न असतो, की मी भारतात किंवा जपानमध्ये जपानी कंपनीत काम नक्की करू शकेन किंवा करत आहे; पण मला त्या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये काम करता येईल का? मी स्वतः जपानमध्ये कंपनीच्या सीईओ आणि सीएफओबरोबर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केले आहे. मी कॉम्पुटर इंजिनिअर आहे, मला जपानी भाषा येते, मी एमबीएसुद्धा केले, याचा मला नक्कीच उपयोग झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महत्त्वाची गोष्ट म्हणजे जपानमध्ये तुम्ही तांत्रिक शिक्षण घेतल्यावरच तशा कंपनीमध्ये काम करू शकता, असे मुळीच नाही. मी प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करत असताना आमच्या पॅनेलने सुपर मार्केटमध्ये काम करणाऱ्या एका उमेदवाराला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आयटी प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी घेतले होते. मला हे पचविणे थोडे अवघड होते. मात्र, माझ्या एचआर मॅनेजरने स्किल्स आणि शिक्षण, यांचा समन्वय कसा पाहावा, हे मला समजून सांगितले. त्यानंतर या उमेदवाराने थेट प्रोजेक्ट मॅनेजरचे काम केल्याचे मी स्वतः अनुभवले आहे. हा जपानी लोकांचा वेगळा दृष्टिकोन मी अगदी जवळून पाहिला आहे. 

आपण जपानमध्ये उच्च पदावर काम करणाऱ्या काही मराठीभाषक उमेदवारांची माहिती पाहूया... 
१. बीकॉम झालेले एक उमेदवार जपानमध्ये एका प्रसिद्ध आयटी कंपनीमध्ये बिझनेस युनिट हेडचे काम करतात. अर्थात, त्यांचे जपानी भाषेचे आणि संस्कृतीचे ज्ञान खूपच  चांगले आहे. हे काम करताना तांत्रिक गोष्टींची माहिती त्यांना नक्कीच करून घ्यावी लागली असेल; परंतु ते सहजशक्य आहे. 

२. पुण्यातील योगेंद्र पुराणिक ऊर्फ योगी यांनी पुण्यामधून जपानी भाषेचा अभ्यास केला. अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि  संगणक क्षेत्राचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांना जपान सरकारची शिष्यवृत्ती दोनदा मिळाली आणि ते त्या शिष्यवृत्तीमुळे दोनदा जपानला गेले. त्यानंतर जपानमधील मोठमोठ्या आयटी कंपन्या, तसेच वित्तीय संस्थेमध्ये त्यांनी उच्च पदावर नोकरी केली. यादरम्यान सामाजिक कार्य करून ते तेथे निवडणुकीस उभे राहून निवडूनही आले. आज ते  टोकियोमधील एदोगावा विभागाचे सिटी कौन्सिलर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व, शिक्षण याच गोष्टींबरोबर याचे बरेचसे श्रेय हे त्यांच्या जपानी भाषेवरील प्रभुत्वाला जाते. जपानमध्ये राजकारणात ठसा उमटविणे, ही मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे.

३. जपानमध्ये अनेक महाराष्ट्रीय लोकांचे व्यवसाय आहेत आणि ते फक्त टेक्निकल नसून, वेगवेगळ्या क्षेत्रांमधले आहेत; म्हणजे हिऱ्यांचे व्यापारी, आयटी कंपन्या, ट्रेडिंग कंपन्या, मेकॅनिकल क्षेत्रांमधील कंपन्या, रिटेल  क्षेत्रांमधील कंपन्या, कन्सल्टिंग कंपन्या इत्यादी.

४. जपानमध्ये काही महाराष्ट्रीय महिलांचे व्यवसायही आहेत. काही महिला उच्च पदावर नोकरीला आहेत. काही जणी शैक्षणिक क्षेत्रात असून, अगदी उच्च दर्जाचे काम करत आहेत.  

हे सगळेच जण आपले आदर्श आहेत. महत्त्वाचा मुद्दा, जपानमध्ये काम करण्यासाठी जपानी भाषेवर प्रभुत्व, जपानी संस्कृतीचा अभ्यास, जपानी व्यवसाय करण्याच्या पद्धतीचा अभ्यास आणि आपले शिक्षण, या गोष्टी असाव्या लागतात. जपान स्किल्सला प्राधान्य देते, त्यामुळे अगदी विशेष शिक्षण म्हणजे आयटीमध्ये काम करण्यासाठी ‘आयटी’चीच पदवी हवी, असे नाही.

Edited By - Prashant Patil

loading image