बुकीश : पुस्तके, पुस्तकांवरची

Book
Book

वाचनाच्या संदर्भात माझ्या एका वार्ताहर मित्राचा एक किस्सा आहे. वय आणि अनुभव या दोन्हीबाबतीत हा मित्र माझ्यापेक्षा ज्येष्ठ असला, तरी त्याच्या उमद्या स्वभावामुळे आमच्या मैत्रीत आदरार्थी बहुवचनांची अडगळ नव्हती. त्याच्या बोलण्यात पुस्तकांचे संदर्भ खूप असायचे. असंच बोलता बोलता एकदा त्यानं मला त्या संदर्भांचं रहस्यही सांगून टाकलं होतं. तो स्वतः सगळी पुस्तकं वाचायचाच असं नाही, पण वेळात वेळ काढून तो वाचणाऱ्या त्याच्या मित्रांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल त्यांच्याकडून ऐकायचा. चांगला वाचक एखाद्या पुस्तकाबद्दल बोलतो, तेव्हा तो पुस्तकातला नेमका भाग नेमकेपणाने सांगत असतो, असं त्याचं त्यामागचं गणित होतं. हे पहिल्यांदा ऐकल्यावर मला खूप भारी वाटलं. अर्थात, पुस्तक वाचून त्याबद्दल भरभरून, पण नेमकं बोलणारा माणूस शोधण्यापेक्षा पुस्तक शोधून ते वाचणं जास्त सोपं असतं, हे मला यथावकाश कळलंच म्हणा. 

‘वर्ल्ड फेमस बुक्‍स इन आऊटलाईन’ हे पुस्तक हातात पडल्यावर मला हा किस्सा आठवला होता. जागतिक साहित्याच्या जगात दशकानुदशकं किंवा प्लेटोच्या ‘द रिपब्लिक’सारख्या काही शतकांपासून वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांची ओळख करून देणारा हा ग्रंथ काही महिन्यांपूर्वी अवचितच माझ्या संग्रहात दाखल झाला.

या पुस्तकात अशी पंचावन्न पुस्तकं सारांश रूपानं भेटतात. वाचायला लागल्यापासून कानावर पडणाऱ्या, पण न वाचलेल्या काही पुस्तकांची तोंडओळख ‘वर्ल्ड फेमस बुक्‍स’मुळं झाली. अरुण टिकेकरांचं ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’, निरंजन घाटेंचं ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’, नितीन रिंढेंचं ‘लिळा पुस्तकांच्या’ अशी पुस्तकांवरची आणखी काही आवडलेली पुस्तकं. पुस्तकांवरची पुस्तकं शोधताना असंच एकदा ‘हाऊ टू रीड ए बुक’ सापडलं. हे पुस्तक वाचता न येणाऱ्यांसाठी आहे, असं लेखक पहिल्याच वाक्‍यात सांगून टाकतो. माझ्या संग्रहातलं पुस्तकांवरचं आणखी एक मजेशीर पुस्तक आहे.

माझ्या त्या वार्ताहर मित्राला ते पुस्तक वाचून त्यावर बोलणारा माणूस फारच आवडला असता. हाऊ टू टॉक अबाऊट बुक्‍स यू हॅवन्ट रीड - तुम्ही न वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोलायची वेळ आलीच - तर काय कराल, असाच त्या पुस्तकाचा विषय आहे. ही दोन्ही पुस्तकं माझ्या संग्रहात असली, तरी अजून मी प्रस्तावनांच्या पलीकडं गेलेलो नाही...

विलक्षण साहित्य प्रकार
बुक्‍स ऑन बुक्‍स हा एक विलक्षण साहित्यप्रकार आहे. पुस्तकांविषयी, वाचनाविषयी बोलणारी पुस्तकं, पुस्तकवेड्यांनी पुस्तकांच्या निमित्ताने लिहिलेली. मग ती एखाद्या पुस्तकाची गोष्ट असेल, पुस्तकाचा परिचय असेल किंवा एखाद्याच्या पुस्तकप्रेमी वाचकाच्या वाचनप्रवासाची, वाचनातून मिळणाऱ्या आनंदाची कहाणी असेल. ग्रंथ हेच गुरू असं म्हटलं जातं, तसं पीटर स्लोटरडिक नावाचा जर्मन तत्त्वज्ञ पुस्तकांना मित्रांना लिहिलेली जाडजूड पत्रं म्हणतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com