ऑन एअर : ऐसा कैसा पैसा वैसा?

On-Air
On-Air

आपण किती सुसंस्कृत आहोत, हे दाखवायला मराठी वाक्यातील शेवटचे काही शब्द आम्ही पुन्हा इंग्लिश इंग्रजीमध्ये म्हणतो. We say them again! 

आम्ही काही इंग्रजी शब्दांना मराठीत वेगळा अर्थ देऊन देखील चालवतो. उदाहरणार्थ प्रोफेशनल म्हणजे ज्या व्यक्तीने त्याच्या उपजीविकेच्या साधनासाठी उच्चशिक्षणाची साधना केलेली असते. किंवा नमक हलाल, कर्तव्यदक्ष व्यक्ती. भावनिक न होता शांतपणे चोख काम करणारी व्यक्ती. मराठीत मात्र प्रोफेशनलचा अर्थ (नाराज आवाजात) ‘तुझं काम करेल, पण साला फुकट करणार नाही, पैसे घेणार,’ असाही होतो. मराठी माणसाला धंदा करता येत नाही असं आपण नेहमी म्हणतो. काहीजण खंत व्यक्त करतात, तर काही अभिमानानं म्हणतात. पैसे कमावणारे वाईट (असतात किंवा बनतात किंवा बनाव लागतं). धंद्यासाठी लागणारे ज्ञान, कष्ट करायची तयारी, अभ्यास, सचोटी या सगळ्या गोष्टी इतर सगळ्यांप्रमाणेच मराठी माणसातही आहेत. अडतं इथंच. मराठी माणूस आणि त्याचं पैशाशी असलेलं डिस-फंक्शनल नातं. याची सुरुवात कॉलेजमध्ये होते. प्रत्येक कॉलेजमध्ये २-४ प्रचंड सुंदर मुली असतात. सगळी मुलं आलटून पालटून त्यातल्या एकीच्या किंवा कधी कधी एकाच वेळी चौघींच्या प्रेमात पडतात, पण उघडपणे क्वचितच हे प्रेम व्यक्त होतं. खरंतर ती खूप हवीहवीशी असते, पण आपली पोरं अनेक कारणं सांगतात. पुढं जाऊन हीच मुलं पैशाला सुंदर मुलीसारखं वागवतात. आपण मनात पैशाबद्दल अनेक फॅंटस्या रंगवतो, पण बाहेर ‘आपल्याला कसा काहीच फरक पडत नाही,’ असं दाखवत फिरतो.

या आपल्या वागण्याची मुळं वर्णव्यवस्थेचेही आहेत. कोणी काय काम करावं, त्याचा किती मोबदला मिळावा, पैशात किती, धान्यात किती आणि आशीर्वादात किती फेडावा हे निकष आपल्या सोशल डीएनएमध्ये आजही असणारच. मराठी माणसानं पैशावर मोठी चर्चा करणं गरजेचं आहे. त्याची सुरुवात आपण कोरोनाच्या काळातच करायची गरज आहे. कारण सध्या पैसे कमी आणि वेळ जास्त आहे. सुरुवात डॉक्टरांपासून करूया. टेलिफोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे पेशंट तपासून सल्ला दिल्यानंतर स्वतःच्या तोंडानं आपली फी कशी मागायची, या विवंचनेत अनेक डॉक्टर आहेत.

पोट साफ होतंय ना विचारणारे, तुम्हाला वाचवायला पाय कापावच लागेल असं म्हणून लगेच तो कापून टाकणारे डॉक्टर. यांना पैसे मागण्यात इतका संकोच वाटावा! कारण आत्तापर्यंत ते काम रिसेप्शनिस्टकडं दिलेलं होतं.

खरंतर त्यांच्यावर पैसे मागण्याची वेळ येऊ नये, पण काही पेशंटना वाटतं की नुस्तं फोनवर बोलायचे कसले पैसे? आर्थिक परिस्थिती बरी असताना महत्त्वाचे सल्ले फुकट घ्यायचा मोह आपण आवरावा, असा फुकट सल्ला मी तुम्हाला देतोय.

माझा जिगरी मित्र, त्याला आपण फ्रांज काफ्काच्या कादंबरीतल्या नायकासारखं नुसतं ‘K’ म्हणूया, याचा बिझनेस कन्सल्टन्सीचा आहे. शून्यातून मोठे उद्योग अनेक लोकांनी उभे केलेत, पण यानं ते शिखरापर्यंत नेऊन पुन्हा शून्य केले आहेत. याला वेगळं कौशल्य लागतं. हे मी उपरोधानं म्हणत नाहीये. नुसता यशाचा अनुभव असलेल्या मंडळींकडून शिकण्यासारखं फार नसतं. म्हणजे असतं, पण आपण चुकीच्या गोष्टींवर फोकस करतो. त्यांच्या यशापेक्षा त्यांच्या चुकांमधून आपण जास्त शिकू शकतो. म्हणून Kचा सल्ला घ्यायला खूप लांबून मंडळी त्याच्या घरी येतात. त्यात काही फुकटात सल्ला घेणारी मित्र मंडळीही असतात. K अशावेळी टाइमप्लिज म्हणून आतल्या खोलीत जातो आणि सूट-टाय घालून येतो आणि औपचारिक इंग्रजीत बोलायला लागतो. यार गेला आणि प्रोफेशनल आला हे सगळ्यांना स्पष्ट होतं.

पुढच्यावेळी डॉक्टरांचा फोनवरून सल्ला घेताना त्यांनी काय परिधान केलंय, विचारा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com