शाळा निवडताना... (सम्राट फडणीस)

School-Choice
School-Choice

पालक म्हणून आपणही मुलांच्या गुणवत्तेचे निकष ठरवायला हवेत. केवळ पैकीच्या पैकी मार्क मिळाले, म्हणजे मूल घडतं, या समजातून बाहेर पडायला हवं. अनेक शाळा मुलांमधल्या कौशल्यांना वाव देण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत असतात. अशा शाळांमधले शिक्षक नियमित कामांच्या पलीकडं जाऊन मुलांसाठी धडपडत असतात. पालक म्हणून अशा शिक्षकांना दाद देणं आपलं कर्तव्य आहे.

समाजाच्या जडणघडणीत शालेय शिक्षणाचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. एखाद्या समाजाचं भविष्य समजून घ्यायचं असेल, तर त्या समाजाच्या शालेय शिक्षणाची परिस्थिती समजून घेतली, तरी पुरेसं असतं. उद्याची पिढी कोणत्या दिशेनं जाणार आहे, याची चुणूक शालेय शिक्षण व्यवस्था दाखविते. शाळा, शाळांचा परिसर, तिथला शिक्षक वर्ग, अभ्यासक्रम अशा अनेक बाबींनी मिळून ही शिक्षण व्यवस्था बनते.

व्यवस्था चालविणारे घटक सदृढ, दूरदृष्टीचे, दिशादर्शी असतील तर उत्तम पिढी घडते. महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यामध्ये शिक्षणाकडे सातत्याने लक्ष दिलं गेलं. त्याचे परिणाम म्हणून शिक्षणाची उत्तम व्यवस्था असणारी केंद्रं निर्माण झाली. पिंपरी- चिंचवड हे त्याचं ठळक उदाहरण मानता येईल. 

औद्योगिक नगरी म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर ठळक स्थान मिळविणाऱ्या पिंपरी- चिंचवड महानगरानं गेल्या दशकभरात शिक्षणाच्या नकाशावरही आपला बिंदू बळकट केला आहे. बालवाडीपासून ते उच्चशिक्षणापर्यंतची शिक्षण व्यवस्था पिंपरी चिंचवडमध्ये उभी राहिली आहे. उत्तम शाळांचं जाळं इथे तयार झालं आहे. दर्जेदार शिक्षणाची पुणे महानगराची परंपरा होतीच; त्या परंपरेतला नवा धागा पिंपरी चिंचवडने विणला आहे. परंपरेतलं जे जे चांगलं ते ते आत्मसात करत पिंपरी- चिंचवडने शिक्षण क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामध्ये या शहरातील शाळांचं मोठं योगदान आहे. शालेय शिक्षणाचे आजघडीचे सर्व पर्याय पिंपरी- चिंचवडमध्ये उपलब्ध आहेत.

एसएससी, सीबीएससी, आयसीएसई अशा पर्यायांचा त्यामध्ये समावेश आहे. पर्याय वाढतात, तेव्हा निवडीला वाव असतो आणि त्याचवेळी गोंधळही होण्याची शक्‍यता असते. आपल्या मुला-मुलींचं भविष्य ठरविणारी शाळा निवडावी कशी, हा नवाच प्रश्न निर्माण होतो. 

एसएससी आणि सीबीएसई या अभ्यासक्रमांमध्ये दहा वर्षांपूर्वी मोठी दरी होती, ती दरी आता कमी होते आहे. त्यामुळे, अभ्यासक्रम निवडतानाच दमछाक करून घेण्याचं ठोस कारण उरलेलं नाही. बहुतांश शाळांमध्ये स्कूल व्हॅनची सुविधा उपलब्ध झालेली आहे.

परिणामी, शाळांचं अंतर हाही प्रश्न निकालात निघतो आहे. आता शिक्षणाचा दर्जा आणि सुविधा या प्रमुख गोष्टींकडे पालक म्हणून अधिक लक्ष देणं आवश्‍यक बनलं आहे. अभ्यासक्रम कोणताही असो, शिक्षक किती जीव लावून विद्यार्थ्यांना घडवत आहेत, हे पालक म्हणून पाहायला हवं. ई क्‍लासरूम यांसारख्या अत्याधुनिक पद्धती शिक्षणात आल्या आहेत. पारंपरिक शिक्षणपद्धतीत वाचन आणि लेखन या दोन कृतींना महत्त्व होतं. त्यातून पाठांतरावर अनावश्‍यक भरही दिला गेला. शिक्षणपद्धती त्यापुढे आली आहे. आता ई क्‍लासरूमच्या माध्यमातून वर्गात विद्यार्थी-विद्यार्थिनींना गोष्टी स्क्रिनवर पाहता येत आहेत. उदा. वीस वर्षांपूर्वी स्टेप्स आणि प्रेअरीज याबद्दल बोलताना भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातलं चित्र मुलांसमोर असायचं. आजच्या वर्गात स्टेप्स आणि प्रेअरीजचे व्हिडिओ मुलांना दाखविता येतात आणि माहितीची ज्ञानात रूपांतर करण्याची वाट अधिक समृद्ध करता येते. तीच गोष्ट गणिताच्याबाबतीत घडते आहे. अत्यंत मनोरंजक पद्धतीने अल्जिब्रा शिकविण्याच्या पद्धती ई क्‍लासरूममध्ये विकसित होत आहेत. शाळांमधील सुविधांमध्ये एकेकाळी मैदानी खेळांचा निकष मानला जायचा. वाढत्या नागरीकरणामुळे आकसलेली मोकळी जागा पाहता इनडोअर खेळांनाही तितकंच महत्त्व आलं आहे. पालक म्हणून या गोष्टींची दखल आपल्याला घ्यावी लागणार आहे. 

केवळ ई-क्‍लासरूम हा एकच निकष डोळ्यांसमोर ठेवायला नको. दिवसातले सहा-सात तास आपलं मूल ज्या शिक्षकवर्गाच्या सान्निध्यात आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची वृत्तीही बाळगावी लागेल. अनेक शाळांमध्ये आज लहान मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास असणारे तज्ज्ञ उपलब्ध असतात. मुलांनी चुकीचं वर्तन केलं, की सरसकट शाळांवर दोष ठोकून देण्याची बहुतांश पालकांची मानसिकता असते. मानसोपचार तज्ज्ञ शाळांमध्ये मुलांशी बोलतात, तेव्हा वर्तनातल्या अनेक विसंगती मुलांनी कुटुंब आणि परिसरातून उचलल्या असल्याचं उघड होत असतं. त्यामुळे, सरसकट शाळांवर गोष्टी ढकलून देण्याच्या आमिषापासून पालक म्हणून आपण दूर राहायला हवं. तो पालक म्हणून आपली जबाबदारी टाळण्याचा प्रकार ठरू शकतो.

मुलांच्या गुणवत्तेचे निकष पालक म्हणून आपणही ठरवायला हवेत. केवळ पैकीच्या पैकी मार्क मिळाले, म्हणजे मूल घडलं या समजातून बाहेर पडायला हवं. अनेक शाळा मुलांमधल्या कौशल्यांना वाव देण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत असतात. अशा शाळांमधले शिक्षक नियमित कामांच्या पलीकडं जाऊन मुलांसाठी धडपडत असतात. पालक म्हणून अशा शिक्षकांना दाद देणं पालकांचं कर्तव्य आहे. ते पार पाडलं जातं का, हेही तपासून पाहिलं पाहिजे. 

चांगल्या शाळेत चांगलं शिक्षण आपल्या मुलाला मिळायला हवं, ही भावना प्रामाणिक आहे. चांगलं शिक्षण म्हणजे उद्याच्या समाजात जगताना, उभं राहताना, यशापयशाला सामोरं जाताना आपल्या मुला-मुलीचं अनुभवाचं अवकाश विस्तारलेलं असणं. अनुभवाचं विस्तारणं ही प्रक्रिया आनंददायी बनवी, यासाठी शाळा आहेत. उगवत्या पिढीचं अनुभवविश्व समृद्ध करणारी शाळा निवडणं ही भूमिका पालक म्हणून आपल्याला निभवावी लागणार आहे. ‘सकाळ’ आज प्रसिद्ध करत असलेला विशेषांक या वाटेवरचं पहिलं पाऊल ठरावं, ही अपेक्षा.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज सर्व प्रकारच्या शाळांचे उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध आहेत. शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम, खेळ व इतर शाळाबाह्य उपक्रम यांनुसार काही निवडक शाळांचा घेतलेला आढावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com