esakal | तुझं असं वेगळं काही शोध!
sakal

बोलून बातमी शोधा

Education

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

तुझं असं वेगळं काही शोध!

sakal_logo
By
शिवराज गोर्ले

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मान्यवर मंडळीचं त्यांच्या मुलांशी असणारं पालकत्वाचं नातं आपण जाणून घेत आहोत. त्या नात्यातून मुलं कशी घडत जातात हे समजून घेणार आहोत. ‘आजही लेखक विद्याधर पुंडलिक यांची मुलगी अशी माझी कुणी ओळख करून दिली की, वडील म्हणून लाभलेल्या या ‘आभाळा’बद्दल मन कृतज्ञतेनं भरून येतं,’  असं लेखिका मोनिका गजेंद्रगडकर म्हणतात. 

पालक म्हणून लेखक विद्याधर पुंडलिक कसे होते? मोनिकाला त्यांनी कसं वाढवलं.. किंवा खरं तर वाढू दिलं? 

‘आपल्याला एक तर मुलगी हवी, तीच घराचं घरपण राखते,’ अशा मताचे विद्याधर पुंडलिक होते, हे मोनिका अभिमानानं सांगतात. त्यामुळंच ‘तू मुलगी आहेस म्हणून..’ हे वाक्‍य मोनिकाला बालपणापासूनच कधी चुकूनसुद्धा ऐकावं लागलं नाही. तिला दोन्ही भावांइतकंच स्वातंत्र्य मिळत होतं किंबहुना जरा अधिकच. ‘स्त्री म्हणून तिला लग्नानंतर बरंच काही अपरिहार्यपणे करावं लागणारच आहे, तर आता तिला तिच्या मनासारखं हवं ते करू दे,’ असं म्हणत पुंडलिकांनी मोनिकाला हवं तसं बागडण्याचं मनमुराद स्वातंत्र्य बहाल केलं होतं. अर्थात, एक प्रश्‍न येतो, वडील या नात्यानं त्यांनी लेकीवर कुठलीच बंधनं घातली नव्हती का? या प्रश्‍नाचं उत्तर तर फारच मजेशीर आहे. मोनिका म्हणतात, ‘अण्णांनी माझ्यावर ‘बंधनं’च आणली असतील तर ती वाचनाची, पुस्तकांच्या सहवासात राहण्याची.

वेगवेगळ्या कवी, लेखकांच्या शब्दांवरून जीव ओवाळून टाकण्याची. शास्त्रीय संगीताच्या, वादनाच्या मैफली मनमुराद ऐकण्याची. उत्तम नाटकं चित्रपट आवर्जून पाहण्याची, चित्र-शिल्पकला, कलात्मक वस्तू आणि साहित्य प्रदर्शनांना भेटी देण्याची. या अशा सुंदर बंधनामुळे माझ्या आयुष्यातले लहानसहान क्षण उत्कट होत गेले. साधे संस्कारही वारशाच्या रूपात माझ्याकडं जमा होत गेले.’ विद्याधर पुंडलिक यांच्या मुलीकडून काय अपेक्षा होत्या? ते मोनिकाला म्हणत असत, ‘तू चारचौघीसारखी मळल्या वाटेनं चालू नकोस. तुझ्यासाठी तुझं असं काही वेगळं शोध, ज्यातून तुझी ओळख सापडेल?’ मुलीला अशी स्वतःची ओळख सापडावी, या हेतूनंच ज्या वयात मोनिकाच्या मैत्रिणी खेळण्यात, भटकण्यात गुंग असायच्या, त्या वयात पुंडलिकांनी मोनिकाला सतार शिकायला लावलं. सतारच का? ते पुढील भागात.