esakal | ‘पास होशील ना?.. मग झालं तर!’
sakal

बोलून बातमी शोधा

Education

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

‘पास होशील ना?.. मग झालं तर!’

sakal_logo
By
शिवराज गोर्ले

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
विद्याधर पुंडलिक यांनी लेक मोनिकाला शाळेत असतानाच सतार शिकायला लावलं. सतारच का तर, सतार तशी वाजवायला अवघड असते म्हणून. अर्थात, त्यात संगीताचं त्यांचं प्रेम होतंच. ते स्वतः उत्तम गात असतं. रोज अंघोळीच्या वेळी त्यांचं जे ‘गाणं’ असायचं ती घरच्या साऱ्यांसाठी मैफीलच असायची, पण तेवढंच नव्हतं. रोज रात्री जेवण झाल्यावर ते मोनिकाला घेऊन बाहेर पडायचे. घरालगतच्या वर्दळ नसलेल्या अशा शांत रस्त्यावरून फिरताना ते रंगात येत. आलाप, ताना, सुरावटी ‘आ’कारात गात आणि मोनिकाला त्यातले स्वर ओळखायला लावत. त्यांनी घेतलेल्या मिंडेतला एखादा कणस्वर मोनिकानं ओळखला की ते खूष होऊन ‘वा, सतारिया माझी?’ म्हणत. हेही बजावत, ‘तुझ्या वडिलांनी दिलेली ही स्वरांची भेट कायम सांभाळ. चिरंतन आनंद देणारे स्वर तुला मी दिलेत.’ लग्नातही त्यांनी, लेकीला घरचा आहेर म्हणून अप्रतिम कोरीव काम केलेली सतारच दिली होती. 

‘आपल्याला मिळालेले वडील चारचौघांपेक्षा वेगळे आहेत ही जाणीव मला फार लवकर झाली,’ मोनिका म्हणतात, ‘तरीही वडील म्हणून असणाऱ्या माझ्या बाळबुद्धीच्या अपेक्षा मात्र अण्णांकडून कधीकधी पुऱ्या होत नसत. तसे ते मनस्वी, स्वकेंद्री, धांदरट, विसराळू असल्यानं क्वचित ताप होत असे. मला आठवतच नाही की.,इतर मैत्रिणीच्या वडिलांसारखे अण्णा माझ्या शाळेत ‘पालक’ म्हणून शिक्षकांना भेटायला आले, ना कधी ते मला माझे गुण विचारायचे. इतकंच नाही तर मी कितवीत आहे, हेही त्यांना ठाऊक नसायचं.

कुणी विचारलं तर ते गडबडून मलाच विचारत, ‘अगं खरंच तू यंदा कितवीत आहेस?’ मी खट्टू व्हायचे. पण हेच माझ्या वडिलांचं अधोरेखित करावं असं वेगळेपण आहे हे कळलं, तेव्हा दहावीचा गणिताचा पेपर मला विलक्षण अवघड गेला. घरी येताच मी रडत सुटले. अण्णा शांतपणे मला समजावत म्हणाले, ‘पास होशील नं, मग झालं तर! अगं नाही जमली ती फत्रुड आकडेवारी तर नाही जमली. तुझ्यासारखी सुंदर सतार वाजवणं किती जणांना जमतं सांग?’ 

हा अनुभव सांगून मोनिका म्हणतात, ‘होय, माझे वडील कुणी ‘खास’ होते. शब्द ज्यांचं साध्य आणि साधनही होतं, असे प्रतिभावान साहित्यकार ज्यांनी केवळ शब्दांच्या, विचारांच्या, चिंतनाच्या बळावर काही अभिजात निर्माण करू पाहिलं. त्यांचा वारसा मला संचितच वाटतं. जे संचित एक अक्षय दीप बनून माझ्या आयुष्याला उजळवत आजही तेवतो आहे.