जपान आणि संधी  : रेलचेल सण-समारंभांची...

Japan-and-Opportunity
Japan-and-Opportunity

जपानला भारतासारखीच खूप जुनी संस्कृती आहे. जपानमध्ये सतत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सण साजरे होत असतात. त्यातील काही सणांची माहिती जपानी शिकणाऱ्या आणि जपानबद्दल उत्सुकता असणाऱ्या लोकांना हवीच. जपान हा होक्काइदोपासून ओकिनावापर्यंत उभा खूप बेटांनी बनलेला देश आहे. येथे अनेक सण साजरे होतात. 

सप्पोरो स्नो फेस्टिवल
हा सप्पोरो येथील वर्षाचा सर्वांत मोठा सण आहे. त्याची सुरुवात १९५०मध्ये झाली, जेव्हा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मध्य सप्पोरोच्या ओदोरी पार्कमध्ये बर्फाचे पुतळे बांधले. हा सण आता खूप मोठा आणि व्यावसायिक झाला आहे. सुमारे १०० बर्फाच्या शिल्पांसह या उत्सवासाठी सुमारे एक डझन मोठी शिल्पे तयार केली जातात. अनेक मैफिली आणि इतर कार्यक्रमही आयोजित केले जातात.

आओमोरी नेबुता फेस्टिवल
हा उत्सव दरवर्षी आयोजित केला जातो आणि त्यात नेबुता नावाच्या रंगीबेरंगी कंदील फ्लोट आढळतात, जे मध्य आओमोरीच्या रस्त्यावर सजवले जातात. हा उत्सव दरवर्षी सुमारे २-७ ऑगस्टदरम्यान आयोजित केला जातो. हा कार्यक्रम लाखो प्रवाशांना आकर्षित करतो. या उत्सवाच्या दरम्यान, २० मोठ्या नेबुता फ्लोट्स आओमोरी जेआर रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर पाहायला मिळतात. हे फ्लोट्स लाकडी तळ आणि धातूच्या चौकटींनी बनविलेले आहेत. जपानी कागदपत्रे, ज्याला वाशी म्हटले जाते, ते फ्रेम्सवर रंगवले जातात.  या उत्सवाचा नृत्य अविभाज्य भाग आहे. तेथे हानेतो नर्तक आहेत आणि ते या नृत्यासाठी विशेष पोशाख घालतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गिओन फेस्टिव्हल (मात्सुरी)
गिओन  फेस्टिव्हल दरवर्षी  क्योतोमध्ये होतो आणि हा जपानमधील सर्वांत प्रसिद्ध सण आहे. जियोन फेस्टिव्हल हा रोग निर्माण करणाऱ्या घटकांच्या शुद्धीकरणासाठी साजरा करतात. तो १७ आणि २४ जुलै कालावधीत होते. उत्सवात अनेक समारंभांचे आयोजन केले जाते, परंतु हे यमाबोको जुनकोच्या परेडसाठी प्रख्यात आहे. परिसरात याकीतोरी (चिकन), तायकी, ताकोयाकी, ओकोनोमीयाकी, पारंपारिक जपानी मिठाई आणि इतर अनेक पाककृती विकणारे स्टॉल्स असतात. युकाता परिधान केलेल्या स्त्रिया आपल्या आसपास पारंपरिक पर्स आणि कागदी पंखा घेऊन फिरतात. 

कांदा फेस्टिव्हल
याला शिन्तो फेस्टिव्हलही म्हटले जाते. टोकियोमधील कांदामधील देवस्थानाजवळ हा फेस्टिव्हल साजरा केला जातो. १५ मेच्या जवळच्या शनिवारी आणि रविवारी हा सण साजरा केला जातो. यातील प्रमुख परेडमध्ये संगीतकार, नर्तक आणि फ्लोट्स व्यतिरिक्त २००हून अधिक मीकोशींचा समावेश आहे.

अकिता कांतो फेस्टिव्हल
हा एक जपानी उत्सव आहे, जो  ३-७ ऑगस्टदरम्यान साजरा होतो. अकिता शहर, अकिता प्रांतामध्ये पिकांचा चांगला  हंगामा होण्याच्या आशेने साजरा केला जातो. या वेळी पाच ते बारा मीटर लांबीचे सुमारे दोनशे बांबूचे खांब लोक रात्रीच्या वेळी पालखीसारखे खांद्यावर वाहून नेतात.

बाहुली महोत्सव
हा सण ३ मार्चला साजरा होतो. या दिवशी कुटुंबीय त्यांच्या मुलींच्या सुख-समृद्धीसाठी आणि निरोगी जीवनासाठी प्रार्थना करतात. उत्सव घरात आणि समुद्रकिनारी होतो. तरुण मुली त्यांचे सर्वोत्तम किमोनो घालतात आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणीच्या घरी भेट देतात. हिना बाहुल्या, सम्राट, महाराणी, ​​सेविका आणि प्राचीन दरबारी पोशाखातील संगीतकारांच्या बाहुल्यांचे संच घरात स्थापित केले जातात. (जसे आपल्याकडे गौरीसमोर मांडलेले असतात) आणि कुटुंब हिशिमोची आणि शिरोझांके खाऊन साजरे करतात. माझी या महोत्सवाची  विशेष आठवण म्हणजे, माझ्या शेजारच्या काकूंनी मला १५ बाहुल्यांचा सेट भेट दिला आहे. त्या माझ्यावर मुलीसारखे प्रेम करायच्या आणि त्यांची ही भेट माझ्यासाठी नक्कीच अनमोल आहे.

बोन फेस्टिव्हल
आपल्याकडे  जसा पितृपक्ष असतो तसाच जपानमध्ये पूर्वजांच्या आत्मसन्मानासाठी हा फेस्टिव्हल साजरा केला जातो. ही बौद्ध- सांस्कृतिक प्रथा आहे, ज्यामध्ये लोक वडिलोपार्जित कुटुंबात परत येतात. पूर्वजांच्या थडग्यांना  भेटी देतात. यामध्ये बोन ओदोरी या पारंपरिक नृत्याचाही समावेश आहे. हे नृत्य सोपे असते आणि जपानी लोक पर्यटकांना त्यात सामावून घेतात.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com