esakal | डी.एल.एड प्रवेशाकडे ४७ टक्के विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ
sakal

बोलून बातमी शोधा

डी.एल.एड प्रवेशाकडे ४७ टक्के विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

डी.एल.एड प्रवेशाकडे ४७ टक्के विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या डी.एल.एड म्हणजेच ‘डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन’ या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ५३ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. उर्वरित जवळपास ४७ टक्के विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) ‘डी.एल.एड’ प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी ऑनलाइनद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील ६०४ अध्यापक विद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. या अध्यापक विद्यालयातून एकूण जवळपास ३२ हजार जागा उपलब्ध झाल्या आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी केवळ १२ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

हेही वाचा: प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे 'मराठी'ची पेट रद्द! 15 सप्टेंबरला फेर परीक्षा

त्यातील सहा हजार ३० विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत निवड झाली. या फेरीतंर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आठ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत जवळपास तीन हजार २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर सुमारे दोन हजार ८३० विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत निवड होऊनही प्रवेश घेतला नसल्याचे निदर्शनास आले आहे. आता या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तर प्रवेशाची तिसरी फेरी १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, असे राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीने स्पष्ट केले आहे.

loading image
go to top