esakal | प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे 'मराठी'ची पेट रद्द! 15 सप्टेंबरला फेर परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे 'मराठी'ची पेट रद्द! 15 सप्टेंबरला फेर परीक्षा

प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे 'मराठी'ची पेट रद्द! 15 सप्टेंबरला फेर परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मराठी विषयाच्या 'पेट' परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेत चुका असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे केली. त्याची दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने तज्ज्ञांची समिती नियुक्‍त केली आणि या समितीच्या अहवालानुसार 213 विद्यार्थ्यांची 'पेट' पुन्हा घेण्याचा निर्णय झाला. 15 सप्टेंबरला या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदा 'पीएचडी'च्या 613 जागांसाठी पेट परीक्षा घेतली. ऑनलाइन परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर विद्यापीठाने निकालाची अंतिम तयारी केली. मात्र, मराठी विषयातील प्रश्‍नपत्रिकेत व्याकरणाच्या त्रुटी असल्याची लेखी तक्रार 213 पैकी एका विद्यार्थ्याने विद्यापीठाकडे केली. त्याची दखल घेऊन विद्यापीठाने अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, मराठी विषयाचे अधिष्ठाता आता पेपर सेट करणारे प्राध्यापक यांची स्वतंत्र समिती नियुक्‍त केली.

या समितीने तक्रारीच्या अनुषंगाने अभ्यास केला आणि अहवाल कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस व प्र-कुलगुरु डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्याकडे दिला. समितीच्या अहवालानुसार मराठी विषयातील उमेदवारांची पेट पुन्हा घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परीक्षा विभागाने दिली. आता 15 सप्टेंबरला सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. दोन तासात विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार पेपर सोडवायचा असून परीक्षेसाठी एक तासाचा वेळ असणार आहे, असेही सांगण्यात आले.

हेही वाचा: सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेस आमदार पीएन पाटील यांच्यासह मुलाकडून छळ

पीएचडीसाठी घेतलेल्या 'पेट'ध्ये मराठी विषयातील प्रश्‍नपत्रिकेत व्याकरणात त्रुटी राहिल्याची तक्रार विद्यापीठाकडे प्राप्त झाली. विद्यार्थी हित लक्षात घेऊन मराठी विषयातील 213 उमेदवारांची 15 सप्टेंबरला पुन्हा 'पेट' घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला.

- शिवकुमार गणपूर, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

विषयनिहाय लागणार मेरिट यादी

राज्यशास्त्र, विज्ञान, पत्रकारिता यासह अन्य विषयांची 'पेट' झाल्यानंतर विद्यापीठाने मराठी विषय वगळता अन्य विषयांचा जनरल निकाल जाहीर केला आहे. आता विषयनिहाय निकाल लावला जाणार असून त्यात पीएचडीसाठी विषयनिहाय जागा, स्थानिक विद्यापीठातील उमेदवार, अन्य विद्यापीठाचे उमेदवार, आरक्षण, यानुसार अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. एका जागेसाठी तीन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. काही दिवसांत त्यांच्या मुलाखती होणार असून त्याचे वेळापत्रक लवकरच प्रसिध्द केले जाईल, असेही सांगण्यात आले. यंदा मुंबई, पुणे विद्यापीठासह अन्य विद्यापीठातील उमेदवारांनीही पीएचडीसाठी अर्ज केले आहेत.

loading image
go to top