गटचर्चा : स्पर्धा परीक्षांची संजीवनी

नमस्कार मित्रांनो, आज आपण गटचर्चा किंवा समूह चर्चा करताना होणाऱ्या चुका आणि घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती घेऊ.
Competitive Examinations group discussion
Competitive Examinations group discussionSakal

- अविनाश शितोळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक लेखक - द लॉजिक बूस्टर, द ॲनालिस्ट

नमस्कार मित्रांनो, आज आपण गटचर्चा किंवा समूह चर्चा करताना होणाऱ्या चुका आणि घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती घेऊ. समूह चर्चा किंवा गटचर्चा हे कल्पना आणि दृष्टिकोन यांचे देवाण-घेवाण करण्याचे माध्यम आहे.

गटचर्चेचे मुख्य उद्दिष्ट हे प्रत्येक सहभागीला विशिष्ट विषयांवर त्याचे विचार आणि कल्पना व्यक्त करण्याची संधी देणे, तसेच गटातील इतर सदस्यांकडून ऐकून घेणे आणि शिकण्यास प्रोत्साहित करणे हे असते. चर्चेमुळे एखादा अवघड विषय स्पष्टपणे समजून घेणे सोपे होते. विद्यार्थ्यी त्यांच्याकडच्या नवीन कल्पना इतर विद्यार्थ्यांना शेअर करतात.

विषयाला अनेक पैलू असू शकतात. जेव्हा अनेक विद्यार्थी एखाद्या विषयावर चर्चा करतात, तेव्हा त्या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही तयार करतात. गटचर्चा तुम्हाला स्वतःला सुधारण्याची संधी देते. कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या चुका आणि कमकुवतपणा ओळखता येतो.

मौखिक चाचणी आणि मुलाखती हा स्पर्धा परीक्षा क्षेत्राच्या अभ्यासाचाच भाग आहे. परीक्षकांसमोर एखाद्या विषयावर आपले विचार कसे मांडायचे आणि व्यक्त करायचे, हे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. गटचर्चेत भाग घेतल्याने तुमची वक्तृत्वकौशल्य सुधारण्यास मदत होते. ऐकण्याचे कौशल्य वाढते.

इतरांच्या कल्पना काळजीपूर्वक ऐकण्याची आणि समजून घेण्याची मानसिकता वाढते. गटचर्चा परीक्षार्थींना त्यांच्या अभ्यासात रस निर्माण करण्यास उपयुक्त ठरतात. स्पर्धा परीक्षेच्या मुलांमध्ये एक नवीनच ट्रेंड निर्माण झाला आहे की, पाच वाजता ब्रेक घेऊन चहा घेणे!

चहा पिण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त दहा मिनिटांचा वेळ लागतो, परंतु बरेच परीक्षार्थी सर्रासपणे एक ते दोन तास वायफळ चर्चा करताना दिसतात. अभ्यासामध्ये ब्रेक आवश्यक आहे, परंतु अभ्यासाच्या माध्यमात केलेला बदल हीच विश्रांती समजून त्यासोबत त्या ब्रेकमध्ये काही शॉर्टनोट्स असतील तर त्या काळामध्येसुद्धा गटचर्चा यशस्वीपणे होऊ शकते.

गटचर्चेचे सदस्य मुख्यत्वे आपल्या अभ्यासिकेतील विद्यार्थी, आपल्यासोबत राहणारे मित्र आणि अभ्यासाबद्दल सीरियस असणारे लोक असावेत. प्रकर्षाने ते एकाच परीक्षेचा अभ्यास करणारे असावेत. त्यामुळे तुमचे मन विचलित न होता तुम्ही तुमच्या ध्येयापासून भरकटत नाहीत.

गटचर्चा कशी असावी?

परीक्षेचा अभ्यासक्रम, मागील वर्षाचे आयोगाचे प्रश्न आदी गोष्टींचा सारासार विचार करून गटचर्चेची एक रणनीती ठरवली जावी. ज्यामध्ये एका वेळेस एकच विषय चर्चेसाठी घेतला जावा. कारण आयोग आपल्याशी दोनच माध्यमातून संवाद साधत असतो, तो म्हणजे अभ्यासक्रम आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका.

चर्चा करताना मतभेद असले तरी चालतील, परंतु मनभेद असता कामा नयेत. राजकीय घडामोडी, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी या चर्चांना जास्त महत्त्व देऊ नये. यामध्ये मतभेदा बरोबरच मनभेद होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्या प्राथमिकता बदलतात आणि अभ्यास भरकटायला लागतो.

चर्चा किती वेळ, कुठे व्हावी?

चर्चेला असे काही ठरावीक ठिकाण असावे असे आपण ठरवू शकत नाही. ही चर्चा कुठेही होऊ शकते, परंतु व्यक्तिपरत्वे गरजा बदलू शकतात, मत बदलू शकते. काहींना शांत ठिकाणी, गोंगाट नसावा या ठिकाणी चर्चा चांगली घडते असे वाटते. ज्या वेळी आपल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त काही वेळ शिल्लक राहतो आणि त्या वेळात अभ्यासामध्ये सातत्य राहत नाही, अशा वेळी मित्रांकडे भेटायला किंवा फिरायला जाण्यापेक्षा गटचर्चा करण्यास प्राधान्य द्यावं.

गटचर्चा करताना...

गटचर्चा करताना कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन सदस्य असावेत. कारण गटचर्चेमध्ये तीनपेक्षा जास्त व्यक्ती असतील, तर गटबाजी होण्याची शक्यता असते. तीन सदस्यांमध्ये गट निर्माण होऊ शकत नाहीत. ते एकमेकांवर अवलंबून असल्या कारणाने ते गटबाजीपासून लांब राहतात आणि वायफळ किंवा वैयक्तिक चर्चेपासूनही लांब राहतात.

गटचर्चा करताना प्रामुख्याने मोबाईल, तसेच इतर तत्सम बाबी की, ज्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये अडचणी येऊ शकतात त्या दूर ठेवलेल्या कधीही चांगल्या. गटचर्चेमध्ये संकुचित वृत्ती असणारे मित्र नसावेत. त्यामुळे अभ्यासात भर पडण्याऐवजी नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे माहितीच्या देवाण-घेवाणीमध्ये परिपूर्णता येत नाही.

गटचर्चेमुळे होणाऱ्या फायद्यांचा सामान्यपणे जर आपण विचार केला, तर प्रत्येकाला मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळते. सदस्यांमध्ये चांगला संवाद वाढतो. त्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. शेवटी जाता जाता एवढेच सांगेन की, ‘एकटे आपण खूप कमी करू शकतो; मात्र, एकत्र आपण खूप काही करू शकतो.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com