मार्गदर्शकाची भूमिका

मित्रहो, स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहामध्ये शिरणं फार सोपं, परंतु यातून विजयी होऊन बाहेर पडायचं असेल, तर श्रीकृष्णासारखा एखादा गुरू तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे.
role of a mentor
role of a mentorsakal

- अविनाश शितोळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक लेखक - द लॉजिक बूस्टर, द ॲनालिस्ट

कवी वैभव देशमुख लिहितात,

तू लोटले कड्याहून

अन् पंख खोलले मी,

वाटा तुझाच मोठा

आहे यशात माझ्या!

मित्रहो, स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहामध्ये शिरणं फार सोपं, परंतु यातून विजयी होऊन बाहेर पडायचं असेल, तर श्रीकृष्णासारखा एखादा गुरू तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. गुरूचा उद्देश तुम्हाला एक व्यक्ती म्हणून वाढण्यास आणि स्वत-ची सर्वोत्तम आवृत्ती बनण्यास मदत करणे हा आहे. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामधील मार्गदर्शक किंवा गुरू हा फक्त तुमचा वेळ वाचावा म्हणून तुम्हाला नोट्स देणारा व्यक्ती नसतो, तर तो खऱ्या अर्थाने दिशा देणारा आणि तुमची उत्पादकता क्षणोक्षणी वाढवणारा व्यक्ती असतो.

मार्गदर्शक म्हणजे कोण?

मार्गदर्शन, सोप्या भाषेत म्हणजे-निर्देशित करणे किंवा साह्य प्रदान करणे. ज्याला मदतीची गरज आहे. समुपदेशन म्हणजे, प्रदान केलेल्या व्यावसायिक सेवांचा संदर्भ होय. समुपदेशन हा मार्गदर्शनाचा अविभाज्य आणि मध्यवर्ती भाग मानला जातो. स्पर्धा परीक्षेत हवे ते यश मिळत नसल्याने आपण जेव्हा निष्क्रिय बनतो तेव्हा हाच मार्गदर्शक आपल्या पाठीवर हात ठेवतो, प्रसंगी आपला कान पिळतो आणि परत एकदा अभ्यासाच्या वाटेवर यायला मदत करतो.

मग हा मार्गदर्शक फक्त आपल्याला शिकवणाराच व्यक्ती असतो का? तर निश्चितच नाही! हा मार्गदर्शक तुमच्या अभ्यासिकेत बसणारा एखादा दादा असू शकेल, हा मार्गदर्शक तुमच्या आजूबाजूला असून, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आंतर्बाह्य अनुभव घेतलेली एखादी व्यक्ती असू शकेल किंवा कोणतीही परीक्षा पास न झालेली एखादी व्यक्तीसुद्धा असू शकेल.

यांपैकी कोणाकडूनही मार्गदर्शन घेण्यात कोणताही कमीपणा नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण पास झालेली माणसे काय करावे? हे सांगतात, परंतु नापास झालेली माणसे काय करू नये? हे सांगतात. त्यामुळे दोघांचेही मार्गदर्शन तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रकाश दाखवणारे दिवे

एखाद्या गाडीमध्ये आपण प्रवास करत असतो आणि अंधार पडतो, तेव्हा त्या गाडीला वेग देणाऱ्या चाकांपेक्षा त्या गाडीला प्रकाश दाखवणारे दोन दिवे सर्वाधिक महत्त्वाचे ठरतात. दिवे नसतील तर अपघात ठरलेलाच असतो. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या पायांचा वेग आणि कामाची तत्परता कितीही असली, तरी प्रकाश दाखवणारा मार्गदर्शक तुम्हाला योग्य ध्येयापर्यंत लवकर पोहोचवू शकतो.

आज स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये गल्लोगल्ली तज्ज्ञ आणि स्वयंघोषित मार्गदर्शकांचा सुळसुळाट झाला आहे, हे मला मान्य आहे. परंतु, त्यातही सुयोग्य मार्गदर्शक निवडताना मनाचा कल आणि आपल्याला ज्याचं मार्गदर्शन आवडतं अशा व्यक्तीची निवड होणे गरजेचे आहे.

पिढ्या घडवणारा गुरू

एकदा तुमचा मार्गदर्शक ठरला आणि त्याने आखून दिलेल्या पद्धतीवर तुम्ही चालायला सुरुवात केली की, यश मिळणे ही फक्त औपचारिकता शिल्लक राहते. डॉ. ए. पी. जे. कलाम हे पुस्तकांना गुरू मानत असत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपले आयुष्य घडवले. अगदी तद्वतच आपणही मार्गदर्शकाच्या सान्निध्यात आणि पुस्तकांच्या सहवासात वेळ घालवला, तर नोकरी मिळेलच आणि आयुष्यही समृद्ध झाल्यावाचून राहणार नाही.

एक इंजिनियर चांगलं काम करत नसेल, तर त्यामुळे रस्ते, पूल बिघडून देश दहा वर्षे मागे जाऊ शकतो. एक डॉक्टर चांगलं काम करत नसेल, तर लोकांचं आरोग्य बिघडून समाज शंभर वर्ष मागे जाऊ शकेल, परंतु जर एक शिक्षक चांगलं काम करत नसेल, तर अनेक पिढ्या उद्ध्वस्त होऊन संबंधित देश व समाज हजारो वर्षे मागे जात असतो. त्यामुळेच ज्ञान आणि कौशल्याने आपलं आयुष्य सजवताना मार्गदर्शकाचा हात त्यामागे असणं अत्यंत आवश्यक ठरतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com