

Students who develop dedication at an early age are more likely to achieve academic excellence and professional success.
Sakal
विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर
समर्पण हा असा गुण आहे; ज्यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. एखादा प्रकल्प, एखादी मोठी गोष्ट, मोठे आव्हान यांचे यशामध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे काय असते तर समर्पण. तुम्ही स्वतःला त्यासाठी शंभर टक्के झोकून द्यावे लागते. वैयक्तिक समर्पणाबरोबर तुमच्या आजूबाजूच्या साथीदारांनी त्याच भावनेने काम केले तर नक्कीच यश मिळते. आपल्या आयुष्यात कोणतीही गोष्ट करताना समर्पणाचे प्रात्यक्षिक करू शकलो तर अनेक गोष्टी साध्य करू शकतो. योग्य वयात समर्पणाचे महत्त्व समजले आणि मुलांनी हा घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजविल्यास अनेक क्षेत्रात यश मिळवू शकतात. मुलांच्या वाढत्या वयात समर्पणाचे धडे पालकांनी दिल्यास त्याचा फायदा पाल्याला आयुष्यभर नक्कीच होणार असतो. पाल्य घरातच पालकांचे वागणे, त्यांची कृती, त्यांचे संस्कार हे गुण जवळून बघतात. त्यांना वेगळे प्रशिक्षण द्यावे लागत नाही. आपण स्वतःला एखाद्या कामासाठी झोकून दिले आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता ते काम पूर्ण केले तर त्यातून मिळणारा आनंद वेगळाच असतो. पालकांनी त्यांच्या मुलांना हे गुणधर्म उदाहरणे देऊन सांगितले पाहिजे. पालकच या गोष्टींचे प्रात्यक्षिक घरात देऊ शकले तर त्याला तोडच नाही. समाजकार्यात संपूर्ण देशात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते असे मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधना आमटे. या जोडप्याने (व पुढे जाऊन त्यांच्या पिढ्यांनी) जे अनन्य साधारण काम केले आहे ती, एक समर्पणाची पाठशाळा आहे. अत्यंत दुर्गम भागात गडचिरोली जिल्ह्यात आनंदवन येथे कुष्ठरोगांसाठी एका झाडाखाली सुरू केलेल्या छोट्या उपचार केंद्राचे मोठ्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाले. बाबा आमटे यांनी त्यातूनच ‘लोक बिरादरी प्रकल्प’ सुरू केला व पुढे जाऊन संपूर्ण आयुष्य त्या कामासाठी वाहून दिले. समर्पणाची अतिशय उच्च पातळी म्हणजे आमटे कुटुंबीयांची समाजसेवा. त्यांच्या कामाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली व त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली.