‘फॉरेन्सिक सायन्स’मधील संधी

अनेकांना गुन्हेगारी संदर्भातील तपासयंत्रणांच्या कामाविषयी कुतूहल असते. पंचनाम्यापासून सुरू होणारी शोधमोहीम आणि तपासव्यवस्था पुढे अत्यंत शास्त्रोक्त मार्गाने काम करते. ही यंत्रणा न्यायालयीन कामकाजासाठी पुराव्यांचे विश्लेषण करते आणि अचूक अनुमानापर्यंत येते.
careers forensic science
careers forensic scienceSakal

- प्रा. विजय नवले

अनेकांना गुन्हेगारी संदर्भातील तपासयंत्रणांच्या कामाविषयी कुतूहल असते. पंचनाम्यापासून सुरू होणारी शोधमोहीम आणि तपासव्यवस्था पुढे अत्यंत शास्त्रोक्त मार्गाने काम करते. ही यंत्रणा न्यायालयीन कामकाजासाठी पुराव्यांचे विश्लेषण करते आणि अचूक अनुमानापर्यंत येते. त्याला ‘फॉरेन्सिक सायन्स’ असे म्हटले जाते. चित्रपट आणि टीव्हीवर पाहताना ग्लॅमरस वाटणारे हे काम प्रत्यक्ष प्रचंड गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट असते.

कोर्स

बीएससी फॉरेन्सिक सायन्स हे शिक्षण या कार्यक्षेत्राशी संबंधित आहे. बीएससी बारावीनंतर तीन वर्षांचा कोर्स आहे. पदवीनंतर पुढील कोर्स जसे की, एमएससी, पीएचडी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आदी करता येतात. या शिक्षणाच्या माध्यमातून फॉरेन्सिक क्षेत्रात कामासाठी दाखल होता येते. पॅथॉलॉजी, मेडिकल, संगणक विषयाशी संबंधित तज्ज्ञ मंडळीदेखील त्यांच्या ज्ञानाचा वापर या क्षेत्रातील कामासाठी करू शकतात.

ऑनलाइन कोर्स

नियमित विद्यापीठीय कोर्सप्रमाणेच काही ऑनलाइन कोर्सही आहेत, जसे की, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड फॉरेन्सिक, सर्टिफाइड फॉरेन्सिक ॲनालिस्ट, पेनिट्रेशन टेस्टिंग इन्सिडेंट रिस्पॉन्स अँड फॉरेन्सिक, ॲडव्हान्स सर्टिफिकेट इन फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड फ्रॉड एक्झामिनर.

पात्रता

बीएससी फॉरेन्सिक सायन्स कोर्ससाठी फीजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी/मॅथेमॅटिक्ससह बारावीचे शिक्षण झालेले असावे. यासाठी स्वतंत्र प्रवेशपरीक्षा नसते. बारावीच्या गुणांवर प्रवेश दिले जातात. काही संस्थांमध्ये प्रवेशपरीक्षा घेतली जाऊ शकते.

विषय

क्राईम अँड सोसायटी, कायदा, गुन्हेगारी, फॉरेन्सिक बायॉलॉजी, फॉरेन्सिक केमिस्ट्री, फॉरेन्सिक डर्माटोग्लिफिक्स, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, बायोमेट्रिचा परिचय, फॉरेन्सिक औषधे, संगणक आणि तपासणी, अर्थशास्त्र, इंग्लिश आदी विषय अभ्यासावे लागतात.

नोकरीच्या संधी

फॉरेन्सिक सायन्समधील तज्ज्ञांना शासनातील, तसेच संबंधित कामाच्या महत्त्वाच्या विभागांमध्ये अत्यंत जोखमीच्या मोहिमांसाठी नियुक्त केले जाते. पोलिस विभाग, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI), इंटेलिजन्स ब्युरो (IB), रुग्णालये, कायदेविषयक आस्थापना, संरक्षण/सेना, केंद्र सरकार, फॉरेन्सिक सायन्स लॅब, खासगी गुप्तहेर संस्था या ठिकाणी नेमणुका होतात.

पदे

फॉरेन्सिक एक्सपर्ट, इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर, क्राइम सीन इन्व्हेस्टिगेटर, फॉरेन्सिक सायंटिस्ट, क्राइम रिपोर्टर, हस्ताक्षरतज्ज्ञ, फिंगरप्रिंट एक्सपर्ट इत्यादी.

आवश्‍यक कौशल्ये

फॉरेन्सिक सायन्सचा सखोल अभ्यास, वैज्ञानिकदृष्ट्या कसून तपास करण्याची क्षमता, सार्वजनिक सुरक्षा आणि सुरक्षेचे ज्ञान, उत्कृष्ट लेखन व मांडणी कौशल्य, सरकारी नियमांचे ज्ञान, कायदेशीर बाबींची माहिती, संगणक आणि मुख्य सॉफ्टवेअर पॅकेज सक्षमपणे वापरता येणे.

दैनंदिन कामे

पंचनाम्यांना उपस्थित राहणे, पुरावे गोळा करणे आणि सुरक्षित ठेवणे, उपलब्ध पुराव्यांचे टेस्टिंग करणे, रक्तगट आणि डीएनए प्रोफाइलिंग करणे, औषधे आणि विषाच्या ट्रेससाठी अन्य सॅम्पल्सचे विश्लेषण करणे, हस्ताक्षर, स्वाक्षरी, शाई आणि कागद यांचे विश्लेषण करणे, संगणक, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून डेटा प्राप्त करणे, न्यायालयात निष्पक्ष, वैज्ञानिक पुरावे देणे, अशा प्रकारे फॉरेन्सिक सायन्सचे विश्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com