एकाग्रता वाढवण्याचे आव्हान

डिजिटल युगातील सर्वांत मौल्यवान संसाधन म्हणजे आपली एकाग्रता. या क्षमतेवर प्रभुत्व मिळवणे हे आपल्या भविष्यासाठी आवश्‍यक असून, मुलांमध्येही ही क्षमता विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे.
concentration
concentrationsakal

- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

सततच्या नोटिफिकेशन्सद्वारे आपले चित्त विचलित करणाऱ्या ‘स्मार्ट फोन’पासून ते विविध पोस्टचे अपडेट देणाऱ्या सोशल मीडियाच्या विविध साधनांपर्यंत सगळीकडे वावरताना एकाग्रता राखणे हे सध्याच्या काळातील एक मोठे आव्हान आहे, असे म्हणायला हरकत नाही. स्टॅनफोर्डचे प्राध्यापक निर इयाल यांनी असे म्हटले आहे की, वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता हे कौशल्य म्हणून उदयास आले आहे.

डिजिटल युगातील सर्वांत मौल्यवान संसाधन म्हणजे आपली एकाग्रता. या क्षमतेवर प्रभुत्व मिळवणे हे आपल्या भविष्यासाठी आवश्‍यक असून, मुलांमध्येही ही क्षमता विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना शैक्षणिक व व्यावसायिक यश मिळण्यास मदत होईल.

तुम्ही आणि तुमच्या पाल्यांना एकाग्रता वाढवण्यास मदत व्हावी यासाठी संशोधनावर आधारित काही महत्त्वाच्या टिप्स खालीलप्रमाणे -

स्क्रीन टाइम कमी करा

स्क्रीन टाइम जास्त असल्यास लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे मोबाइलचा कालावधी ठरवून घ्या. मुलांनाही डिजिटल आणि ऑफलाइन कामात संतुलन राखण्यास शिकवा.

मैदानी खेळ

शारीरिक क्रिया, व्यायाम यावर भर द्या. निसर्गाच्या सान्निध्यात राहा. कोणत्याही परिसरावर तेथे नैसर्गिकरीत्या असलेल्या शांततेचा प्रभाव जाणवतो. त्याचा अनुभव घेतल्यास कौशल्याला चालना मिळते.

स्वतःचा वेळ

कोणत्याही व्यत्ययाशिवाय लक्ष केंद्रित करून काम करता येईल अशी जागा आणि वेळ ठरवा. मोबाइल किंवा अन्य कोणतेही उपकरण वापरणार नाही असे ठरवून घ्या आणि त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करा.

कामाचे विभाजन

मोठ्या कामाची छोट्या छोट्या तुकड्यात विभागणी करा. त्यामुळे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. पोमोडोरो तंत्राचा वापर करा. त्यामध्ये २५ मिनिटे काम करून नंतर ५ मिनिटांचा ब्रेक घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे उत्पादकता वाढते.

झोप

झोपेच्या कमतरतेने कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे पुरेशी आणि शांत झोप आपल्याला मिळते आहे ना, याची खात्री करा.

ध्यान

ध्यान, जप आणि दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम केल्याने मानसिक गोंधळ दूर होतो. मानसशास्त्राच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्या लोकांनी केवळ दोन आठवडे ध्यानाचा सराव केला त्यांना लक्ष एकाग्र करण्यात खूप मदत झाली.

आहार

पोषणतत्त्वांनी समृद्ध असलेला संतुलित आहार घेतल्यास लक्ष केंद्रित करून काम करण्यास मदत होते. ‘द जर्नल ऑफ न्यूट्रिशन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, फळे, भाज्या, धान्य आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेला आहार घेतल्यास कार्यक्षमता वाढते.

दिनक्रम

तुमचा दिनक्रम ठरवा आणि तो पाळण्यात सातत्य ठेवा. त्यामुळे आपल्या मेंदूला सातत्य राखण्याची, लक्ष केंद्रित करून काम करण्याची सवय लागते. त्यासाठी संरचित वातावरण तयार होते. त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.

लक्षकेंद्री उपक्रम

जिगसॉ पझल्स, कोडी, सुडोकू, मेमरी गेम्स, एक मिनिटात कोडे सोडवा यांसारख्या बुद्धीला चालना देणाऱ्या उपक्रमांवर भर द्या. त्याचा फायदा होतो.

कला

चित्रकला किंवा हस्तकलेसारख्या कला जोपासल्यास एकाग्रता वाढण्यास मदत होते. एखादे वाद्य वाजवायला शिकण्यानेही लक्ष केंद्रित होते आणि सृजनशीलतेने व्यक्त होण्याची भावना वाढीस लागते.

संवेदनात्मक क्रिया

डोके आणि हात दोन्ही गुंतवून ठेवणारे खेळ किंवा उपक्रम मुलांना करायला दिल्यास मुलांचे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. यामध्ये वर्गीकरण करणे, विविध गोष्टी चिटकवून वस्तू तयार करणे, क्ले मॉडेलिंग अशा विविध उपक्रमांचा समावेश होतो.

लक्ष केंद्रित करणे आणि एकाग्रता वाढवण्याचे अनेक फायदे आहेत. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी pranjal_gundesha या इन्स्टाग्राम पेजला किंवा ‘द इंटेलिजन्स प्लस’ नावाच्या यू-ट्यूब चॅनेलला भेट द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com