
Child Psychology : घरात दुडूदुडू धावणारं मुल पहिल्यांदा शाळेत जाणार? मग या गोष्टी मुलांशी नक्की बोला
Parenting Tips Before Child Entering First Step In School : मे महिना संपून जून लागला की, वेध शाळा सुरू होण्याचे लागतात. सुट्ट्या संपवून शाळेत जाण्याचा बऱ्याच मुलांना कंटाळा येतो. हे सहाजिकही आहे. पण घरात सतत दुडूदूडू धावणारं, खेळकर, मस्तीखोर मुल पहिल्यांदा शाळेत पाठवताना जसं आई वडिलांना टेन्शन येतं तसंच ते मूलही घाबरलेलं असतं.
आई-वडिलांसोडून घरापासून दूर असं ते पहिलांदाच जाणार असल्याने नवीन जगात जाताना भीती वाटणं सहाजिक आहे. म्हणूनच ते रडतात. अशा वेळी मुलाला शाळेत पाठवण्याआधी पालकांनी त्याच्या मनाची तयारी करून घेणं आवश्यक असतं. त्यासाठी या पुढील गोष्टी मुलांशी नक्की बोला.
आपण मुलांना शाळेत घालायचे म्हणून त्यांची ABCD, अ आ इ ई, १,२,३,४ अशा पाढ्यांचा सराव करून घेतो. पण त्यांच्या साठा आवश्यक अशा बऱ्याच गोष्टींकडे दूर्लक्ष करतो. मुळात त्याच गोष्टी त्यांना शिकवणं आवश्यक असतात.
स्वतःच्या गोष्टी स्वतः करणे - घरी पालक मुलांना सर्व गोष्टी पुरवतात. पण घराबाहेर पडल्यावर स्वतःच्या काही गोष्टी मुलांना स्वतः करता येणं आवश्यक असतं. यात स्वतःच्या हाताने खाता येणे, पाणी पिता येणे, बाथरुमला जाता येणे या गोष्टी आवश्यक असतात. शिवाय वस्तू बॅगमध्ये भरून ठेवता येणे, स्वतःचं नाव सांगता येणे वगैरे गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात.
आपण आहोत हा विश्वास देणे - मुलं पहिल्यांदा घरच्यांना सोडून जाताना भीतीने रडतात. पण आपण इथेच आहोत. घ्यायला परत येणार आहोत. शाळा सुटल्यावर मी आहेच इथे उभी असा विश्वास मुलांमध्ये निर्माण करायला हवा. याशिवाय शाळेतही त्यांची तेवढीच काळजी घेतली जाईल जेवढी घरी घेतली जाते, असंही त्यांना समजवा. घ्यायला नक्की कधी येणार हे खरं सांगा, खोटं बोलू नका.
शाळा म्हणजे नवीन अनुभव - अभ्यास म्हटला की, सहाजिकच कंटाळवाणा असा समज बऱ्याचदा मुलांमध्ये निर्माण होतो. पण शाळेत खूप नव्या गोष्टी शिकायला मिळतात, नवे अनुभव, मित्र मिळतात. हे समजवण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत शाळा शाळा खेळू शकतात. म्हणजे शाळा खूप छान असते यावर त्यांचा विश्वास बसेल आणि उत्साह वाढेल.
इतर मुलंही शाळेत जातात - सगळीच मुलं शाळेत जातात, हे समजवण्यासाठी स्कूल बस, व्हॅनमधून शाळेत जाणारी मुलं दाखवा. जमल्यास त्या बस किंवा व्हॅनमध्ये एखादा बसवा.