स्थापत्य अभियांत्रिकीची ‘बांधणी’

देशातलं बांधकाम क्षेत्र आजमितीला ६ कोटींहून अधिक रोजगार देशाला पुरवतंय. रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यामध्ये बांधकाम क्षेत्राचा दुसरा क्रमांक लागतो.
Construction sector Employment Dr Manoj Avankar writes construction of civil engineering
Construction sector Employment Dr Manoj Avankar writes construction of civil engineeringsakal
Summary

देशातलं बांधकाम क्षेत्र आजमितीला ६ कोटींहून अधिक रोजगार देशाला पुरवतंय. रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यामध्ये बांधकाम क्षेत्राचा दुसरा क्रमांक लागतो.

- डॉ. मनोज अवाणकर

देशातलं बांधकाम क्षेत्र आजमितीला ६ कोटींहून अधिक रोजगार देशाला पुरवतंय. रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यामध्ये बांधकाम क्षेत्राचा दुसरा क्रमांक लागतो. या क्षेत्रातही रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होताना दिसत आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात ९ टक्के इतका मोठा वाटा असलेलं बांधकाम क्षेत्र या वर्ष अखेरपर्यंत देशाला रोजगार पुरवणारं क्रमांक एकचं क्षेत्र असेल आणि ७ कोटी ६० लाख लोकांना हे क्षेत्र प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार पुरवेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. हे क्षेत्र परदेशी गुंतवणुकीसाठी खुलं झाल्यामुळे केवळ इमारत बांधकामच नाही, तर फार मोठ्या प्रमाणावर रस्ते, महामार्ग, मेट्रोरेल्वे अशा पायाभूतसुविधा क्षेत्रातही अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या क्षेत्रात भारतात यायला सुरूवात झाली आहे. यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रीय महामार्गाचं जाळं देशभरात विस्तारण्याकरता २ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून २५ हजार किलोमीटरचे नवे रस्ते प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळेच बांधकाम क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी आणि स्वयंरोजगाराच्याही अनेक संधी आगामी काळात निर्माण होणार आहेत. म्हणूनच आगामी काळात स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) करिअरच्यादृष्टीने महत्त्वाचं आणि आशादायी क्षेत्र आहे.

गैरसमज आणि सत्य

विद्यार्थी आणि पालकांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगबाबत काही गैरसमज दिसून येतात. या क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत, इथे उन्हातान्हात, थंडी-पावसात अहोरात्र काम करावं लागतं, या क्षेत्रात इंजिनिअरिंगला साजेसं असं फारसं तांत्रिक आणि आव्हानात्मक काम नाही, असे अनेक गैरसमज सिव्हिल इंजिनिअरिंगबाबत आहेत. याबाबत वस्तुस्थिती पाहुयात. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या क्षेत्रात यायला सुरुवात झाली आहे. या कंपन्यांच्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांच्या उपलब्धतेमुळे आता राष्ट्रीय कंपन्यांनाही बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरता चांगले आणि अनुभवी इंजिनिअर्स हवे असल्याने तशाचप्रकारची पगाराची पॅकेजेस देणं हे बंधनकारक झालं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे केवळ साइटवर उन्हातान्हात उभं राहणं नाही, तर स्ट्रक्चरल किंवा जिओटेक्निकल सल्लागार म्हणून काम करत असताना वातानुकूलित कार्यालयात बसून डिझाईनिंग करायचं मानाचं आणि आव्हानात्मक काम आहे. प्रगत आणि अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रांच्या साहाय्याने बांधकाम प्रक्रियेचं नियोजन केलं जातं. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी इंजिनिअर्सबरोबर काम करताना या क्षेत्रातल्या कामांचीही प्राथमिक माहिती आणि ज्ञान सिव्हिल इंजिनिअर्सना असणं गरजेचं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणं आवश्यक आहे. तसंच विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयांमधून संस्थेच्या खर्चाने अशा बांधकामाच्या साइटवर नेऊन हे बांधकाम कसं केलं जातं, याविषयी माहिती दिली जाते, अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणं गरजेचं आहे.

नोकरीच्या संधी

साइट इंजिनिअर म्हणून काम करण्याव्यतिरिक्त विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी बांधकाम क्षेत्रात उपलब्ध आहेत. वाहतूक क्षेत्रात वाढत्या ट्रॅफिकजामवर उपाय सुचविणारे आणि नवनवीन ठिकाणांना जोडणारे रस्ते आणि त्यांच्या मार्गांचं नियोजन करणारे वाहतूक इंजिनिअर म्हणून काम करता येतं. पाणी, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, विविध प्रकल्पांच्या उभारणीपूर्वी या प्रकल्पांचा पर्यावरणावर कसा परिणाम होऊ शकतो, याबाबतचा आवश्यक असलेला अहवाल देणं, अशा अनेक गोष्टींबाबत पर्यावरण इंजिनिअर म्हणून काम करू शकता. इमारती, रस्ते अशा विविध बांधकाम प्रकल्पांचा विकास नियोजनाप्रमाणे होतो आहे की नाही हे पाहून प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक म्हणूनही तुम्ही काम करू शकता. हे सर्व ऑफिस जॉब्स असल्यामुळे इथे ऊनवारा-थंडीपावसात उभं राहून काम करायची आवश्यकता नसते. या सर्व क्षेत्रांमध्ये सुरुवातीला जरी वर्षाला ५ ते ६ लाखांच्या नोकऱ्या असल्या, तरी अवघ्या काही वर्षातच अनुभव आणि तुमच्या कार्यक्षमतेच्या आधारावर वार्षिक १५ ते १८ लाखांच्या घरात पगाराची पॅकेजेस असलेल्या नोकऱ्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मिळू शकतात.

व्यवसायाच्या संधी

इंजिनिअरिंगच्या इतर रूढ शाखांमध्ये मुख्यतः रोजगारासाठी नोकरीवरच अवलंबून राहावं लागतं. कारण अवजड उद्योग, संगणकाधारित उद्योग यामध्ये स्वयंरोजगार किंवा नवीन उद्योग सुरू करायचा असेल, तर फार मोठं भांडवल लागतं किंवा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या क्षेत्रात असल्यामुळे त्यांच्या स्पर्धेत टिकून राहणं फार कठीण जातं. परंतु सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मात्र, इमारतीचा पाया तसंच रस्ते खचू नयेत यासाठी मातीच्या सखोल परीक्षणाची गरज असते. त्यामुळे अवघ्या १५ ते २० लाखांच्या गुंतवणुकीसह माती परीक्षण प्रयोगशाळा तुम्ही सुरू करू शकता. पर्यावरण क्षेत्रातही पाणी आणि इतर गोष्टींच्या तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू करता येऊ शकते. जलव्यवस्थापन, शेतीसाठी दुष्काळी भागातलं पाण्याचं नियोजन, पूरव्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांमध्येही सल्लागार म्हणून काम करता येतं. या व्यतिरिक्त बांधकाम रसायनांची विक्री करणारी एजन्सी तुम्ही सुरू करू शकता. भिंतींच्या बांधकामासाठी लागणारे काँक्रिट ब्लॉक्स, काँक्रिटच्या जाळ्या, खिडकी दरवाजांच्या फ्रेम्स तसंच रस्त्याच्या बांधकामात वापरले जाणारे पेवर ब्ल़ॉक्स, यासारख्या इतर बांधकाम साहित्याचा कारखाना कमी गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतो. जागांसाठी कर्ज देताना किंवा कोर्टकचेरीच्या कामातही अनेकदा वास्तूंचं मूल्य ठरवावं लागतं. हे ठरवण्यासाठी व्हॅल्युअर्स सिव्हिल इंजिनिअर असतात. थोडक्यात, सिव्हिल इंजिनिअर होणं म्हणजे केवळ उन्हातान्हात उभं राहून इमारती बांधणं नव्हे, तर या क्षेत्रातही मोठा आर्थिक मोबदला मिळवून देणारे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांची गरज

मोठ्या पगाराच्या नोकऱ्या किंवा स्वयंरोजगाराच्या संधींसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना तो राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेची अधिस्वीकृती मिळालेल्या उत्तम शैक्षणिक संस्थेत घ्या. तिथे शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असतो, तो जागतिक दर्जाचा म्हणजे जगातल्या इतर नामांकित विद्यापीठांच्या समकक्ष असतो, तसंच मिळणारी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी ही जगातल्या इतर अनेक देशांमध्ये मान्यताप्राप्त असते. त्यामुळे तुम्हाला आपल्या देशात येणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमधल्या किंवा तुम्ही इतर देशांमध्ये गेलात तर, तिथल्या कंपन्यांमधल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवणं सुलभ होतं.

आज स्पर्धेचं युग आहे. या प्रचंड स्पर्धेत टिकून राहून आपलं वेगळेपण सिद्ध केलं, तरच मोठ्या पगारासह वरच्या पदांवर पोहोचताना व्यावसायिक समाधान मिळवून यशस्वी करिअर करता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडवणाऱ्या आणि सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या अभ्यासक्रमाला उत्तम संस्थेत प्रवेश घेतला, तरच हे साध्य होऊ शकतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com