खासगीरीत्या दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी अंतिम मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC HSC Board exam

फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेस खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्कासह १० ते १२ जानेवारीदरम्यान भरता येणार आहे.

SSC HSC Exam : खासगीरीत्या दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी अंतिम मुदतवाढ

पुणे - फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेस खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्कासह १० ते १२ जानेवारीदरम्यान भरता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे खासगीरीत्या दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्काने ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यास अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांचे अति विलंब शुल्क प्रती विद्यार्थी प्रतिदिन स्वीकारून विभागीय मंडळाकडे दिलेल्या मुदतीत ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी अर्ज भरायचा आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दहावीसाठी ‘http://form17.mh-ssc.ac.in’, आणि बारावीसाठी ‘http://form17.mh-hsc.ac.in’ या संकेतस्थळाला भेट द्यावी. खासगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज भरल्यानंतर त्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांनी परीक्षेचा अर्ज राज्य मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक असणार आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नावनोंदणी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ही अंतिम मुदत आहे. यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे राज्य मंडळाने प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.