Exam : दिवाळीनंतर सत्र परीक्षा; प्रात्यक्षिके उरकण्याच्या घाईत विद्यार्थीच कात्रीत

महाविद्यालय सुरू होऊन दीड महिना उलटला तरी एकही प्रात्यक्षिक घेतले नाही.
exam
examesakal

पुणे - महाविद्यालय सुरू होऊन दीड महिना उलटला तरी एकही प्रात्यक्षिक घेतले नाही. नोव्हेंबरनंतर सहामाही परीक्षेचे वेळापत्रक येईल, या भीतीने एका दिवसाला चार ते पाच प्रात्यक्षिके उरकविण्यात येत आहे.

तर दुसरीकडे अभ्यासक्रम घाईत उरकण्यात येत असून, यात आमचेच मरण होत आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया शहरातील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याने दिली. केवळ एकाच महाविद्यालयात नाही तर सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची हिवाळी सत्र परीक्षा दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमातील ‘टिकमार्क’ पूर्ण करण्यावर भर आहे. प्राध्यापकांची अपुरी संख्या, महाविद्यालयांची नॅक मुल्यांकनाची गडबड आणि अपुऱ्या संसाधनांमुळे काही महाविद्यालयांत अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

विशेष करून पदव्युत्तर पदवी महाविद्यालयांत स्थिती गंभीर असून, दोन-तीन कंत्राटी प्राध्यापकांवर संपूर्ण अभ्यासक्रमाचा भार आहे. त्यात प्रयोगशाळेत नावापुरतेच साहित्य असल्याने विद्यार्थ्यांनाच त्यांच्या खिशातून आवश्यक साहित्य खरेदी करायला सांगितले जात आहे. उशिरा सुरू झालेले महाविद्यालय, अभ्यासक्रम उरकण्याची घाई, असाईनमेंट पूर्ण करण्याची गडबड आणि सणांच्या गर्दीत विद्यार्थीच आता कचाट्यात सापडला आहे.

विद्यार्थ्यांच्या अडचणी..

- अभ्यासक्रम शिकविण्यापेक्षा ‘डिक्लेअर’ करण्यावर भर

- वेळेत पूर्ण करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या विषयांना बगल

- महाविद्यालयांना दिवाळीच्या आधीच अभ्यासक्रम उरकण्यात रस

- अनेक महाविद्यालयांत उशिराने प्रात्यक्षिकांची सुरवात

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वेळापत्रकानुसारच अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना असावी म्हणूनच आधीच यासंबंधीची घोषणा करण्यात येते. प्रत्येक अभ्यासक्रमाच्या सत्रपूर्ततेनंतरच विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असून, प्राध्यापकांनी गडबडण्याचे आणि विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कोणतेच कारण नाही.

- डॉ. विजय खरे, अधिष्ठाता, मानव्य विज्ञानशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

यंदा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्राध्यापकांना पुरेसा वेळ आहे. विद्यार्थ्यांचे पूर्ण समाधान होईल या दृष्टीनेच विनाकारण घाई न करता अध्यापन पूर्ण करावे. विद्यार्थ्यांनीही सुटीत अभ्यासाचे नियोजन करावे जेणेकरून दिवाळीनंतर होणाऱ्या परीक्षांमध्ये तान येणार नाही.

- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com