स्वत:ला कमी लेखू नका!

नगर जिल्ह्यात कोल्हार या अत्यंत छोट्या गावात माझं बालपण गेलं. प्राथमिक शिक्षण तिथे झालं. माझे आई-वडील शेती करत आणि परिस्थिती तशी बेताची होती.
ips sagar kharade
ips sagar kharadesakal

- सागर खराडे, आयपीएस - महाराष्ट्र केडर

नगर जिल्ह्यात कोल्हार या अत्यंत छोट्या गावात माझं बालपण गेलं. प्राथमिक शिक्षण तिथे झालं. माझे आई-वडील शेती करत आणि परिस्थिती तशी बेताची होती. मला आणखी तीन भावंडे. बारावीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर आता पुढे काय करायचं? असा एक मोठा प्रश्‍न माझ्यासमोर होता.

डॉक्टर वगैरे होऊन आयुष्यात पटकन जम बसवता येतो, पैसे मिळवता येतात असा विचार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर असतो. त्या काळातही होता. मात्र, डॉक्टर व्हायला पैसेही खूप लागतात. त्यामुळे तो पर्याय मागे पडला. मी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून मी अभियंता झालो.

अभियांत्रिकीचं शिक्षण २०१५ ला पूर्ण झालं. त्यानंतर लगेच नोकरीही लागली. चांगला पगार होता. मात्र, मन रमत नव्हतं. नोकरी, पैसा यांमुळे स्थैर्य येईल आणि मी माझं व माझ्या कुटुंबाचं भलं करू शकेन हे खरं, पण इतरांचं काय? समाजाचं काय? असे प्रश्‍न मला पडत होते. एक दिवस पूर्ण विचार करून नोकरी सोडली. साधारण अडीच वर्षे माझी नोकरी झाली होती.

स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मी दिल्लीला जावं असं काही जवळच्या लोकांनी, मित्रांनी सूचवलं. मात्र, दिल्लीला राहणं-खाणं, क्लासचा खर्च एवढं परवडणारं नव्हतं. त्यामुळे मी दिल्लीला गेलो, पण क्लास लावला नाही. ‘सेल्फ स्टडी’ करायला सुरुवात केली. काही सीनिअर विद्यार्थी, सहाध्यायी यांना मी शंका विचारायचो. ते मदत करायचे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना मी मागच्या वर्षाच्या प्रश्‍नपत्रिका सोडवणं आणि अभ्यासक्रम समजून घेणं यावर जास्त भर दिला. अभ्यासक्रम समजलेला नसेल, तर खूप गोंधळ उडतो. प्रश्‍नपत्रिका सोडवल्या नाहीत, तर आयोगाची प्रश्‍न विचारण्याची पद्धत कळत नाही. कोणताही मुद्दा आपण कसा अभ्यासतो आणि आयोग त्यावर कसा प्रश्‍न विचारतो?

यात खूप फरक असतो, तो समजून घ्यायला हवा. ग्रामीण भागातील विद्यार्थी बऱ्याचदा मुलाखतीला खूप घाबरतात. मात्र, त्यांनी मनातील न्यूनगंड काढून टाकायला हवा. जेव्हा तुम्ही काही लाख विद्यार्थ्यांमधून मुलाखतीसाठी निवडले जाता, तेव्हाच हे सिद्ध होतं की, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात.

मुलाखत म्हणजे केवळ प्रश्‍न-उत्तरे नसून, त्या परीक्षेचं खरं नाव ‘पर्सनॅलिटी टेस्ट’ आहे, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावशालीपणे मांडा.

पाचव्या प्रयत्नात मला यश मिळाले. आयएएस किंवा आयपीएसच व्हावं असा माझा निर्धार होता आणि तो पूर्ण झाला. तुम्ही प्रामाणिकपणे तयारी करा आणि मेहनत करा. तुम्हालाही एक दिवस नक्की यश मिळेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com