करिअर निवडताना ‘अभिक्षमते’चे महत्त्व

एखादे क्षेत्र जीवनकार्य (करिअर) म्हणून निवडताना त्यासाठी आपली अभिक्षमता आहे ना? हे तपासावे लागते. अभिरुची व कार्यक्षमता या दोन्ही गोष्टी मिळून अभिक्षमता तयार होते.
choosing a career
choosing a careersakal

एखादे क्षेत्र जीवनकार्य (करिअर) म्हणून निवडताना त्यासाठी आपली अभिक्षमता आहे ना? हे तपासावे लागते. अभिरुची व कार्यक्षमता या दोन्ही गोष्टी मिळून अभिक्षमता तयार होते. एखाद्या गोष्टीत रूची आहे, पण क्षमता नाही, तर ते काम करताच येत नाही आणि तसेच क्षमता आहे, पण रुचीच नाही, तर त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जे दीर्घ काळ प्रयत्न करावे लागतात, ते करता येण्याची शक्यता कमी होते.

त्यामुळेच कार्यक्षेत्र निवडताना अभिरुची व क्षमता या दोन्ही गोष्टी म्हणजेच अभिक्षमता तपासणे गरजेचे असते. शालेय जीवनात वेगवेगळे अनुभव घेत आपल्याला नेमकी कशात रुची आहे, हे जाणून घेणे शक्य असते. त्यासाठी ठरवून वेगवेगळे अनुभव घ्यायचे असतात. अनुभव घेता-घेता साधारण रुची, कल कळत जातो.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंतराव नारळीकर म्हणत असत की, ‘माझा जो छंद होता, ज्यात मला आवड होती, तीच गोष्ट मला व्यवसायक्षेत्र म्हणून मिळाल्याने आता कामाचे कष्ट हे कष्ट वाटत नाहीत उलट मला माझ्या छंदाचेच पैसे मिळत आहेत. म्हणूनच रुची कशात आहे? हे शोधले पाहिजे. अनुभव घेता घेता अथवा जागरूक वाचन करता करता एखाद्या क्षेत्रात रुची आहे की नाही? हे ओळखणे शक्य असते.

रुची, कल ओळखता येणे त्या मानाने सोपी गोष्ट असते. मात्र, आवश्यक क्षमता आहेत की नाही? हे ओळखता येणे थोडेसे अवघड काम आहे. कारण शालेय जीवनात मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुभवातून आपल्याला आपल्या क्षमतांचे आकलन पुरेसे होईलच असे नाही. म्हणूनच त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.

एखादं कार्यक्षेत्र आपल्याला जीवनकार्य म्हणून निवडायचं असेल, तर त्यासाठी आवश्यक कार्यकौशल्ये आपल्याला नुसतीच कशीबशी जमून उपयोग नाही. त्यात आपण पारंगत (कॉम्पिटंट) असावं लागेल. एखादी कार्यभूमिका (जॉब प्रोफाइल) साकारण्यासाठी वेगवगळ्या प्रकारची अनेक कार्ये आपल्याला करावी लागतात. त्या कार्यभूमिकेसाठी एक विशिष्ट प्रकारचा कार्यक्षमतासंच अवगत करावा लागतो. अशा संचातील प्रत्येक कार्यासाठी आवश्यक असं ज्ञान, कौशल्य व वृत्ती आपल्याकडे असावी लागते. एक उदाहरण घेऊन हे अधिक समजून घेऊ या.

एखादी परिचारिका ही चांगली परिचारिका कधी असते? तर, जेव्हा तिच्याकडे सोपवलेलं काम यशस्वी करण्याकरिता आवश्यक ज्ञान, कौशल्य व वृत्ती तिच्याकडे आहे. परिचारिकेला अनेक प्रकारची कामे करावी लागतात. त्यातीलच एक म्हणजे इंजेक्शन देणं. आता एखादी परिचारिका इंजेक्शन देण्यात पारंगत आहे असं कधी म्हणता येईल, तर प्रथमतः तिला डॉक्टरांनी द्यावयास सांगितलेल्या इंजेक्शनबद्दलचं संपूर्ण ज्ञान हवं.

इंजेक्शनमधील औषध कोणत्या प्रकारचं आहे? ते किती प्रमाणात द्यायचं आहे? शरीराच्या कोणत्या भागावर द्यायचं आहे? त्याची ‘रिॲक्षन’ आली तर काय करायचं? इत्यादीची माहिती म्हणजेच आवश्यक ज्ञान. आता हे सगळं माहीत आहे, पण इंजेक्शन देण्याचं कौशल्य अवगत नसेल, तर ती परिचारिका काही उपयोगाची नाही.

ॲम्प्यूल फोडून इंजेक्शनमध्ये योग्य प्रकारे औषध घेऊन, रुग्णाला कमीत कमी त्रास होईल अशा प्रकारे शरीराच्या योग्य ठिकाणी सफाईने इंजेक्शन देण्याचे कौशल्य परिचारिकेकडे असलेच पाहिजे. इतकेच नाही, तर स्वच्छता बाळगण्याची, टापटीप राहण्याची, इंजेक्शन देताना रुग्णाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची वृत्ती म्हणजेच सहवेदनात्मक सेवाभावदेखील महत्त्वाचा आहे.

असं अपेक्षित ज्ञान, कौशल्य व वृत्ती या तिन्ही गोष्टी असतील तरच ती परिचारिका तिच्या कामात पारंगत आहे असे म्हणता येईल. सातत्याने स्वतःचं निरीक्षण आपल्याला करावे लागेल. कोणत्या प्रकारचे ज्ञान अवगत करणे आपल्याला सहज शक्य होतं? कोणत्या प्रकारची कौशल्ये आपल्याला सहज जमतात? आपली वृत्ती कोणत्या प्रकारची आहे? याच्या नोंदी ठेवायला हव्यात. त्याद्वारे आपल्या क्षमतांची ओळख आपल्याला होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com