न्यू नॉर्मल : ओळख विमानतळाची आणि व्यवसायाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airport
न्यू नॉर्मल : ओळख विमानतळाची आणि व्यवसायाची

न्यू नॉर्मल : ओळख विमानतळाची आणि व्यवसायाची

पारंपरिक व्यवसायपद्धती बदलून ‘न्यू नॉर्मल’ नवीन कार्यपद्धती, तंत्रज्ञान स्वीकारावे लागत आहे. नवनवीन क्षेत्राच्या व्यवसायातील बदलत जाणाऱ्या कार्यपद्धती आणि तंत्रज्ञानाची रंजक माहिती आपण या सदरातून घेणार आहोत.

‘या वाऱ्याच्या बसुनी विमानी सहल करूया गगनाची’ हे गाणं ऐकलं की डोळ्यासमोर येतं आकाशात झेपावणार विमान, अवजड महाकाय महायंत्र! कोरोनामुळं या महायंत्राची उड्डाणं थांबली आणि ते जमिनीवरच जेरबंद झालं. कोरोनाचा विषाणू वेगाने जगभर फैलावला आणि या महामारीने भारतामध्येही प्रवेश केला. चीनमधून सुरू झालेल्या या विषाणूचा देशादेशांमधील संसर्ग टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा हवाई वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग असलेल्या हवाई क्षेत्राला जमिनीवर स्थानबद्ध करण्यात आलं. लॉकडाऊनमुळं देशभरात ६५० विमानं जमिनीवरच थांबवण्यात आली.

महत्त्व ‘वायदूता’चे

कोरोनाच्या संकट काळात प्रवासी वाहतूक बंद झाली. सारं जग घरात बंद झालं असं असताना ही हवाई वाहतूक सेवाच पुन्हा एकदा खऱ्या अर्थी ‘वायुदूत’ बनून आली आणि तिचं महत्त्व पुन्हा एकदा प्रस्थापित झालं. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात २४ तासांच्या आत पोहोचणार एकमेव वाहन आणि एकमेव सुविधा ही ‘हवाई वाहतूक व्यवस्था’ हे अधोरेखित झालं.

हवाई वाहतूक किंवा विमानसेवा हा शब्द आपण वापरतो तेव्हा तीन गोष्टी प्रामुख्यानं आपल्या डोळ्यासमोर येतात. विमान, विमानतळ आणि प्रवासी किंवा ग्राहक. विमान आणि प्रवासी एकत्र येतात ती जागा विमानतळ. विमानतळ म्हटलं की डोळ्यासमोर येते सौम्य दिव्यांनी उजळलेली भव्य इमारत, स्वच्छ गुळगुळीत फरशी, उंची काचेची तावदानं, सरकते जिने, सतत बदलणारा ‘फ्लाइट चार्ट’, विमान कंपन्यांची कॉउंटर्स, ध्वनिक्षेपकावरच्या घोषणा आणि उत्तम इंग्रजी बोलणारे, पाश्चात्त्य पोशाखातले विमान कंपन्यांचे कर्मचारी. सगळं स्वच्छ, लख्ख आणि आणि नीटनेटकं. गाव ओळखीचं असलं तरी विमानतळ थोडं अनोळखी थोडं औपचारिक संस्कृती असणार.

विमानांची घरघर, लोकांची इच्छितस्थळी पोचायची लगबग, वेगवेगळ्या व्यवस्था जणू एक छोटेखानी शहर! अनेक प्रवासी विमानतळावरून अनेकविध ठिकाणी जातात, त्यांच्या मुक्कामी परत येतात. देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात, विविध नियोजित स्थळी जाणारी विमान वेळेत उड्डाण करतात, सर्व प्रवाशांना अगदी सुरक्षितपणे घेऊन निश्चितस्थानी वेळेत परत येतात. अचंबित करणारा हा सर्व कारभार आहे! सामान्य माणसांच्या मनात विमानतळ आणि विमान प्रवास या विषयी अनेक शंका मनात असतात. विमानतळ सुरक्षित आहे ना? माझी बॅग माझं सामान सुरक्षित जाईल ना? माझं विमान वेळेवर सुटेल ना? तिकीट रद्द झालं तर किती पैसे परत मिळतील? मला इंग्रजीत बोलता नाही आलं तर कोणी मदत करेल ना? अशा अनेक शंका! परंतु आपल्याला हे माहिती हवे की विमान प्रवासासंबंधी सामान्य माणसांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तर कुणा एका यंत्रणेकडं नाहीत आणि कुठली एकच यंत्रणा या सर्व व्यवस्था पाहात नाही. आपला प्रवास सुखकर होण्यासाठी, विमानतळावर पायाभूत सेवा सुविधा आवश्यक असतात. धावपट्टी व्यवस्थापन, प्रवासी स्थानक, मालाचे स्थानक, विमान कंपन्यांचे काउंटर, विमानतळावरील रस्ते आणि वाहनतळ, सर्वांच्या माहितीसाठी विशिष्ट खुणा, घोषणा व माहितीसेवा, प्रसाधनगृह, उपाहारगृह, दुकाने, वातानुकूलन, प्रकाशयोजना, वीज व पाणी पुरवठा, आगीचे निवारण व बचाव कार्य इ. पायाभूत सुविधांची गुंतागुंतीची अत्यंत जटिल अशी विशाल यंत्रणा कार्यरत असते. (क्रमश:)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BusinessAirport
loading image
go to top